Bachchu Kadu, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu On Eknath Shinde : ''...त्यामुळे आयुष्यभर मुख्यमंत्री शिंदेंचा गुलाम म्हणून राहू !''; आमदार कडूंचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Amravati : शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झालं आहे. यानंतर वर्षात युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालाच नाही. त्यामुळे शिंदे सरकारवर टीका तर झालीच शिवाय इच्छुकांची प्रचंड नाराजीही ओढावली. मंत्रिमंडळाला तारीख पे तारीख मिळाल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सातत्यानं संतापही व्यक्त केला.

पण अजित पवारांच्या एन्ट्रीनं युती सरकारमध्ये अस्वस्थता असतानाच कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतानाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आयुष्यभर गुलाम राहू असं मोठं विधान केलं आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू( Bachchu Kadu ) यांनी अमरावती येथे गुरुवारी (दि.१३) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कडू म्हणाले, मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून मग 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.

...त्यामुळे आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू !

कडू म्हणाले, मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्यानं उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे आभार मानतो. आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंत्रिमंडळ विस्तारावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. आम्ही दोन आमदारांनी त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं,आमच्या सरकारला पाठिंबा द्या. तेव्हा एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आम्ही पाठिंबा दिला. बऱ्याचदा विरोधीपक्ष आणि इतर पक्षाकडून भरपूर आमिषं आली. मात्र, उद्धव ठाकरेंनी मला मंत्रिपदाची संधी दिली. त्यांचे आभार मानतो.

"उद्धव ठाकरेंना आपण दिव्यांग मंत्रालय तयार व्हावं यासाठी नेहमी भेटत राहिलो. त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय झालं नाही. त्याचवेळी दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर, कदाचित गुवाहाटीला जाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेंकडे गेलो, तेव्हा आमची अट होती की, दिव्यांग मंत्रालय निर्माण करा. त्यांनी ते कबूलही केलं. माझ्यासाठी हे आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. देशातलं हे पहिलं दिव्यांग मंत्रालय आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळे देशातल पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले. त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू असंही कडू यांनी सांगितलं आहे.

...म्हणून निर्णय मागे घेतला !

कडू म्हणाले, मी मंत्रिपदावर आजच दावा सोडणार होतो. पत्रकार परिषद घेऊन तसं जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुख्यमंत्री सातत्याने फोन करत होते. अर्ध्या तासापासून त्यांचे फोन सुरू होते. आज मंत्रिपदाचा दावा सोडू नको. फक्त मला भेटून निर्णय घे. त्यांनी मला 17 ला भेटायला सांगितलं आहे. मला भेट आणि हवं तर 18 तारखेला निर्णय घे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले. त्यामुळे मी त्यांना 17 तारखेला त्यांना भेटणार आहे. चर्चा झाल्यावर मग 18 ला निर्णय घेणार आहे असल्याचंही त्यांनी सांगितले.

'' काम,पद, हे तर येत राहील. पण...''

मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे. काम,पद, हे तर येत राहील. पण विश्वास जर का गेला तर तो परत येत नाही. आम्ही सामान्यांसाठी लढू शकतो, मरु शकतो पण चापलुसी करु शकत नाही. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हाला अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच घेणंदेणं नाही असं रोखठोक मतही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT