Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

आमदार बावनकुळे म्हणाले, या चौकशीमागे खासगीकरणाचा वास...

आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) चौकशी करावीशी वाटली नाही. आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चौकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या चौकशीमागे खासगीकरणाचा वास येत असल्याचेही ते म्हणाले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या ऊर्जा मंत्रिपदाच्या काळातील कामांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा.

या चौकशीमागे खाजगीकरणाचा वास येत आहे. चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील १६ शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा, असा यामागचा प्रयत्न असू शकतो. देवेंद्र फडणवीस सरकारने लोडशेडींगमुक्त महाराष्ट्र केला. एक शेतकरी - एक डीपी योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखवला. आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली. आमच्या सरकारनेच एलीफेंटाला वीज पोहोचवली. राज्यातील ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन मिळवून दिले. ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज दिली असल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण इतके चांगले काम करुनही आत्ताच चौकशी का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

ही चौकशी आत्ताच करण्यामागचे कारण काय आहे, हे राज्यातील जनतेलाही ठाऊक आहे. त्यांचे मंत्री एक-एक करून अडकत असल्याने आता राज्य सरकार आम्हाला अडकवण्याचा घाट घालत आहेत. पण त्यांचे मंत्री दोषी होते, म्हणून अडकले. आम्ही पारदर्शी कारभार केलेला आहे. आम्हाला कोणत्याही चौकशीची भीती नाही. अशा चौकश्‍यांमधून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही त्यांच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. आम्ही जनतेची कामे करतो, त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT