MLA Kishor Jorgewar
MLA Kishor Jorgewar Sarkarnama
विदर्भ

रेल्वेच्या एसी कोचमधून आमदार जोरगेवारांचे दोन फोन चोरले, रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना काल रेल्वेतील भुरट्या चोरांचा फटका बसला. पंचायतराजचा दौरा आटोपून पंढरपूरवरून मुंबईला परत येत असताना त्यांचे दोन महागडे फोन चोरीला गेले. त्यांनी मुंबईत पोहोचल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली आणि रेल्वेमंत्र्यांनाही पत्र लिहून तक्रार केली आहे.

आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) पंचायत राजच्या दोऱ्यावर सोलापूरला गेले होते. त्यांच्या दौऱ्यातील शेवटचे गाव पंढरपूर (Pandharpur) होते. तेथील काम आटोपून ते कुरुडवाडी स्टेशवरून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये ते मुंबईसाठी (Mumbai) बसले. रात्री झोपेची वेळ झाल्यानंतर त्यांनी फोन चार्जिंगला लावले. अन् पहाटे त्यांना जाग आली असता, दोन्ही फोन चोरीला गेले होते. मग त्यांनी लगेच सहप्रवाशांच्या फोनवरून स्वतःचे नंबर डायल केले. पण तेव्हा दोन्ही मोबाईल फोन स्वीच्ड ऑफ होते.

आमदार जोरगेवार प्रथम श्रेणी वातानुकूलित कोचमधून प्रवास करीत होते. प्रथम श्रेणी कोचमध्येही चोरी होऊ शकते, याची आपणास कल्पना नव्हती, असे त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहूनही तक्रार केली आहे. या घटनेने रेल्वेच्या एसी कोच सेवेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वेच्या प्रवासात आमदारही सुरक्षित नसतील, तर सामान्य प्रवाशांचे काय, असाही प्रश्‍न या घटनेने उपस्थित केला आहे.

दोन्ही फोन चोरीला गेल्यामुळे आमदार जोरगेवार यांची गैरसोय झाली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्यांनी आपले सीम कार्ड्स मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पण अद्याप त्यांना सीम कार्ड्स मिळालेले नाही. ते मिळाल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशन आणि रेल्वे मंत्रालयाशीदेखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने आपल्या सेवेत सुधार करावा जेणेकरून सामान्य प्रवासी सुरक्षित राहिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT