MLA Sudhir Mungantiwar

 

Sarkarnama

विदर्भ

आमदार मुनगंटीवार म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांचे स्‍मारक प्रेरणादायी केंद्र ठरावे...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : चंद्रपूरच्‍या (Chandrapur) महापौरांनी गेल्‍या दोन वर्षांत केलेल्‍या महत्‍वाच्‍या विकासकामांपैकी भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda) चौक सौंदर्यीकरणचे एक काम आहे. आदिवासी बांधवांनी या कामाचा पाठपुरावा करावा. भगवान बिरसा मुंडा यांचे हे स्‍मारक आपल्‍याला प्रेरणा देणारे केंद्र ठरावे, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

चंद्रपूर शहरात नुकत्याच झालेल्या रेल्‍वे स्‍टेशन नजीकच्या बीएसएनएल कार्यालयाजवळ भगवान बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरण तसेच स्‍मारक उभारणीच्‍या कामाच्‍या भूमिपूजन सोहळ्यात आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, भाजप जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, स्‍थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, जयश्री जुमडे, पुष्‍पा उराडे, शीतल कुळमेथे, आदिवासी नेते अशोक तुमराम, नगरसेविका चंद्रकला सोयाम, माया उईके, ज्‍योती गेडाम, शीतल आत्राम, प्रकाश धारणे, धनराज कोवे, रवि आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, जयप्रकाश खोब्रागडे, राजू भगत, रवि लोणकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मी अर्थमंत्री असताना मिशन शौर्यच्‍या माध्यमातून चंद्रपूर जिल्‍ह्यातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट हे शिखर सर केले. आदिवासी बांधव प्रामाणिक व जिद्दी आहेत. एकलव्‍य हे त्‍याचे उत्‍तम उदाहरण आहे. आदिवासीबहुल ग्रामपंचायतींना बजेटच्‍या ५ टक्‍के निधी थेट देण्‍याचा निर्णय आमच्‍या सरकारच्‍या काळात आम्‍ही घेतला होता.

१८५८ च्‍या स्‍वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांशी निकराने झुंज देणारे शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्‍या स्मृतीप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यासाठी मी केंद्र सरकारशी यशस्‍वी संघर्ष केला. शहरातील ज्‍युबिली हायस्कूल परिसरात शहीद बाबूराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियम बांधकामासाठी निधी मंजूर करवून घेतला. भारतीय जनता पक्षाने आदिवासी बांधवांचे हित नेहमी जपले आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे हे स्‍मारक आधुनिक क्रांती ठरो, अशी अपेक्षा आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाला आदिवासी बांधवांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT