MLA Raju Karemore
MLA Raju Karemore Sarkarnama
विदर्भ

राष्ट्रवादीचे आमदार कारेमोरे थांबेनात! महिन्याभरात अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा शिविगाळ

सरकारनामा ब्युरो

भंडारा जिल्हाच्या तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रावादी कॉंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांचा अधिकाऱ्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ करतांनाचा आणखी एक व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात आमदार महाशय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

यापूर्वी नववर्षाच्या सुरुवातीला पोलिस कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतानाचा आमदार कारेमोरे यांचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्या प्रकरणी त्यांना १२ तासाची तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. त्यानंतर आता बांधकाम विभागातील कर्मचारी आणि कंत्राटदाराला अश्लिल भाषेत शिविगाळ करतानाचा आमदार कारेमोरे यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच फिरत आहे. मोहाडी तालुक्यातील धोप गावातील खराब रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी व कंत्राटदाराला जाब विचारताना पुन्हा आमदार महोदयांची जीभ घसरली आहे.

त्यामुळे जामिनावर सुटलेल्या आमदारांना अजुन सुद्धा कायद्याच्या धाक नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नुकताच एका लग्नात ठेका धरतांनाचा त्यांच्या व्हिडीओ चर्चेत आला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत दमदाटी आणि शिवीगाळ करतांनाचा त्यांच्या दुसरा व्हिडिओ वायरल झाल्याने पुन्हा जिल्ह्यात चर्चेचे वादळ उठविले आहे.

यापूर्वीचे प्रकरण काय होते?

व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलिस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडला होता. यावेळी पोलिसांनी ५० लाख रुपयांची रोख रक्कम पळविल्याची तक्रार आमदारांच्या मित्रांनी केली. कारेमोरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन व्यापारी मित्र हे रात्री ९ च्या वाजताच्या दरम्यान घरून ५० लाख रुपयांची रोकड वाहनातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडिकेटर का दाखवला नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

एवढेच नाहीतर ५० लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसांत दिली. दबंगगिरी करणाऱ्या त्या पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी आता स्वतः गृह मंत्र्याकडे करणार असल्याचे सांगितले होते. मोहाडी पोलिसांनी देखील आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणत असल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आमदार कारेमोरे यांनाच अटक केली. त्यामुळे त्यांना एक रात्र तुरुंगात काढावी लागली होती. मात्र आता वरिष्ठाच्या नाराजीनंतर आमदारांनी त्या शिवीगाळीची माफी मागत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT