Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

MLA Ravi Rana : आमदार राणा म्हणाले, त्यातला 'हा' फुसका फटाका आहे !

Atul Mehere

नागपूर : राज्यातील सत्ताधारी पक्षातल्या अमरावती (Amravati) जिल्ह्यातल्या दोन नेत्यांमध्ये आर-पारची लढाई सुरू झाली आहे. सुरुवातीला शीतयुद्ध दिसणाऱ्या या प्रकाराने गंभीर वळण घेतले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दोघांनीही एकमेकांवर आरोप करताना पातळी सोडलेली आहे.

हे दोन नेते म्हणजे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू. (MLA Bacchu Kadu) सुरूवातीला रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला (Guwahati) जाऊन ५० खोके घेतल्याचा आरोप केला. त्याशिवाय हा ‘तोडपाणी’ करणारा आमदार आहे, अशी टिका केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘एका बापाचा असन, त त्येनं पुरावे द्यावे. आरोप सिद्ध झाला त त्येच्या घरी भांडे घासाले जाईन.’ असे आव्हान दिले. यासाठी त्यांनी १ नोव्हेंबरचा अल्टिमेटमही राणांना दिला. ‘१ तारखेले अमरावतीच्या टाऊन हॉलमध्ये दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत वाट पाहीन, अन् नाही आला त त्याले हिजडा घोषित करीन’, असाही इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. यासाठी आमदार कडूंनी काल नागपूरच्या (Nagpur) प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली.

काल बच्चू कडू यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आज आमदार रवी राणा यांनी ट्विट करून बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले आहे. हा एक विझायला आलेला दिवा आहे आणि दिवा विझायच्या पहिले फडफड करतो आणि दिवाळीत फुटलेल्या फटाक्यांपैकी ‘हा’ फुसका फटाका आहे, असे बच्चू कडूंना उद्देशून राणांनी म्हटले आहे. आता हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू आता कोणत्याही थराला जायला तयार आहेत. कारण ‘हा माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न आहे’, असे म्हणत त्यांनी कुणी कितीही फटके देण्याचा प्रयत्न केला तरी मागे हटणार नाही, असे काल सांगितले. त्यावर रवी राणांचे आजचे ट्विट महत्वाचे ठरत आहे. ट्विटमध्ये राणा म्हणतात, दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे.’

गुवाहाटीला जाऊन आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. पैसे दिले असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे सांगावे किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तरी तसा खुलासा करावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे. पैसे घेतले नाही, हे मी सांगत आहो, दिले असतील तर त्यांनी सांगावे, असे अप्रत्यक्ष आवाहनच बच्चू कडू यांनी दिले आहे. आता हा संघर्ष दिवसागणिक गंभीर वळण घेत आहे. हा संघर्ष कुठे जाऊन थांबणार, या दोन नेत्यांच्या भांडणाचा निकाल काय लागणार, याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळासह जनसामान्यांना लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT