Vijay Badkhal, Dr. Chetan Khutemate, Rajesh Pache with MLA Rohit Pawar.
Vijay Badkhal, Dr. Chetan Khutemate, Rajesh Pache with MLA Rohit Pawar. Sarkarnama
विदर्भ

चंद्रपुरातील युवा उद्योजकांना आमदार रोहित पवार देणार टिप्स...

सरकारनामा ब्यूरो

चंद्रपूर : जिल्ह्यातील युवकांना थेट आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधता यावा, याकरिता किसानपूत्र फाऊंडेशनच्यावतीने येत्‍या जानेवारी- फेब्रुवारी महिन्‍यात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच आमदार पवार यांची भेट घेतली.

नुकतेच बारामती येथील बारामती ॲग्रो फार्म येथे किसानपूत्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रा. राजेश पेचे, युवा उद्योजक संतोष कुचनकर यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग, रोजगार, प्रदूषण आणि वन्य मानवजीव संघर्ष, यासविस्तर चर्चा केली. या संमेलनात आपण स्‍वतः मंत्रिमंडळातील युवा मंत्र्यांची वेळ घेऊन येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार चंद्रपुरात येऊन गेले. त्‍यावेळी जिल्ह्यातील उद्योगांविषयी त्‍यांनी सखोल मार्गदर्शन केले. युवा उद्योजक म्‍हणून आमदार रोहित पवार हे युवकांचे आयडॉल आहेत. सोबतच कृषी क्षेत्रात त्‍यांचे मोठे कार्य आहे. त्‍याकरिता जिल्ह्यातील कृषीवर आधारीत उद्योग करण्याकरिता युवकांना प्रेरित करण्यासाठी या युवा संमेलनाचे आयोजन करीत असल्‍याचा मानस किसानपूत्र फाउंडेशनचा आहे. या संमेलनातून जिल्ह्यातील युवकांना राजकारण तसेच उद्योग या दोन्‍ही क्षेत्रांत आपले करिअर करण्याकरिता त्‍यांचे मार्गदर्शन उपयुक्‍त ठरणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेदेखील चंद्रपुरात येऊन गेल्या. त्यानंतर छगन भुजबळ आणि दोन आठवड्यांपूर्वी शरद पवार यांचा विदर्भाचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी चंद्रपूर येथे मुक्काम केला. तेथील उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली. उद्योगांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरचे उपाय याबद्दल उद्योजकांना मार्गदर्शन केले. त्याच कार्यक्रमात पवारांनी किसानपूत्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बारामतीला येण्याचे निमंत्रण दिले होते. तेथे फाउंडेशनच्या सदस्यांनी बारामती ॲग्रो फार्मची पाहणी करून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला व्हावा, यासाठी किसानपूत्र फाउंडेशन काम करीत आहे. त्यांचा बारामती दौरा याच प्रयत्नाचा एक भाग होता. आमदार रोहित पवार यांना संमेलनाला आमंत्रित करून फाउंडेशनने यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवा उद्योजक या संमेलनासाठी उत्सुक असल्याचे प्रा. विजय बदखल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT