Sunil Kedar
Sunil Kedar Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar News : आमदार सुनील केदारांचा 'तो' एक कोटीचा निधी गेला कुठे?

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District's Kodamendhi News : तीन वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री तथा सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी कोदामेंढीचा मुख्य रस्ता करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण आज त्या रस्त्याची दुर्दशा केदारांच्या त्या आश्‍वासनांची आठवण नागरिकांना करून देते. (Kedar had promised to make the main road to Kodamendi)

जिल्हा परिषदेचे सदस्य योगेश देशमुख यांच्या प्रचाराची सभा याच रस्त्याच्या कडेला झाली होती. रस्त्याची दुर्दशा पाहून केदारांनाही तेव्हा राहावले नाही. योगेश देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आणि निवडून येताच या रस्त्याच्या बांधकामाकरिता एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचे रोखठोक बोल केदार मंचावरून बोलले होते.

त्यांच्या आश्‍वासनानंतर नागरिक चांगल्या आणि सुशोभित रस्त्याचे स्वप्न पाहू लागले. तीन वर्षाचा कालावधी लोटून गेला. मात्र अद्यापही निधी या मुख्य रस्त्याकरिता आला नाही. अतिवृष्टी झाली की, पिकाचे आणि रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी आणि यंदादेखील अतिवृष्टीचा फटका मौदा तालुक्याला बसला. अतिवृष्टीमुळे आणि त्यातच जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली.

दरवर्षी पावसाळ्यानंतर कोदामेंढीच्या मुख्य रस्त्याची ठिगळ लावून डागडुजी केली जात होती. मात्र दोन वर्ष अतिवृष्टीचा फटका बसला आणि त्यातच रस्त्याची दुर्दशा झाली. तरीदेखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्त्याची ठिगळ लावून डागडुजी करण्यात आली नाही. रामटेक भंडारा रस्त्याला लागून बंगला चौकापासून केवळ एक किलोमीटर अंतराचा कोदामेंढी येथील मुख्य रस्ता आहे.

नेहमी रहदारीचा असलेला हा रस्ता आहे. कित्येकदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्त्यावर डांबराचे ठिगळ लावून डागडुजी केली जात होती. दोन वर्ष अतिवृष्टीचा फटका देखील बसला. रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी गिट्टी उखडलेली आहे. पाऊस आला की पावसाचे पाणी साचल्याने डबके पाहायला मिळतात.

रस्त्याची खराब स्थिती पाहून कधीकधी तर एस.टी. महामंडळाची बसदेखील गावात प्रवेश करत नाही. यामुळे प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची (Students) मोठी फजिती होते. रस्त्याची स्थिती पाहून जाणार येणारा मनस्ताप व्यक्त करतो आणि गावात सर्वच राजकीय (Political) पक्षांचे मोठमोठे नेते असूनदेखील गावातील मुख्य रस्त्याची ही दुर्दशा अशी खोचक टीका करतात.

निधी प्राप्त झाला नसेल. सर्वच कामाला निधी मंजूर होत नाही. निधीची उपलब्धता नसेल. अतिवृष्टीचा बजेटमध्ये डागडुजीचा प्रस्ताव पाठविला का नाही तो बघून सांगता येईल, असे जिल्हा परिषदेच्या (ZP) बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यदूनाथ निनावे यांनी सांगितले. त्यामुळे आमदार केदारांचे (Sunil Kedar) ते आश्वासन केवळ 'चुनावी जुमला' होते, अशी जनतेची भावना झाली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT