Vikram Kale and Vilasrao Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : सभागृहात आज ‘या’साठी निघाली विलासराव देशमुखांची आठवण!

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : मराठवाडा मुक्ती संग्रामचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १९) विधान परिषदेत निवेदन केले. त्यावर आज विधान परिषदेच्या सभागृहात चर्चा झाली. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची एक आठवण सभागृहाला सांगितली. (That golden day is being written in history)

आमदार काळे म्हणाले, १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा मुक्त झाला. तो सोनेरी दिवस इतिहासात लिहिला जातोय. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक निर्णय झाला होता की, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये - आताचे छत्रपती संभाजी नगर येथे दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक व्हावी. त्यानुसार ती बैठक पुढे काही काळ होत होती. पण नंतर हा प्रघात बंद पडला.

आता आपण मराठवाडा मुक्ती संग्रामचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहो. त्यामुळे स्व. विलासराव देशमुख यांनी सुरू केलेली ती प्रथा पुन्हा सुरू झाली पाहिजे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दरवर्षी १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजी नगरला मंत्रिमंडळ घेऊन आले पाहिजे आणि मराठवाड्याच्या प्रश्‍नांवर तेथे बैठक घेतली पाहिजे. जेणेकरून विकासाच्या संदर्भातील प्रश्‍न बैठकीत मार्गी लागतील, असे आमदार काळे म्हणाले.

मराठवाड्यातील ज्या आमदारांनी योजनांची मागणी केली आहे, त्यावरही बैठकीत चर्चा झाली पाहिजे. मग ते लोकप्रतिनिधी कोण्याही पक्षाचे असो. सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून मागण्या असल्यामुळे सर्वांचाच विचार झाला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ज्या मागण्या करतो, त्या मागण्या आजही पूर्ण झाल्या नाहीत. विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली, ही चांगली गोष्ट आहे.

मराठवाड्याच्या (Marathwada) लढ्यात अनेकांनी योगदान दिले. स्वामी रामानंद तीर्थ त्यामध्ये अग्रस्थानी होते. त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरू झाले. लढणाऱ्यांची भूमी आहे, तशीच ही संतांची भूमी आहे. संत नामदेव, जनाबाई असे अनेक संत मराठवाड्यात होऊन गेले. हे सर्व पुढील पिढीला अभ्यासाला आले पाहिजे. येथे धार्मिक स्थळं आहेत. तुळजाभवानी, नांदेड गुरुद्वारा, माहुरगड, औंढा नागनाथ या क्षेत्रांचा विकास व्हावा, भाविकांना जाता यावे, त्यासाठी चांगले रस्ते मराठवाड्यात होण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजी नगर -पैठण रस्ता चौपदरी व्हावा, ही मागणी केली. पण घोषणेशिवाय काहीही झाले नाही. पैठणला एमआयडीसी झाली आहे, येलोरा, अजिंठ्याला जायला चांगला रस्ता नाही. यासाठी टाईमबॉंड योजना ठरवली पाहिजे. नांदेडमध्ये (Nanded) देश विदेशातून शीख बांधव येतात. त्यासाठी छत्रपती संभाजी नगर ते नांदेड चौपदरी रस्ता झाला पाहिजे. समांतर समृद्धी मार्गाची घोषणा यासंदर्भात झाली, पण होणार केव्हा, हे सांगितले गेले नाही. कधी पूर्ण करणार, हे स्पष्ट करावे, तरच अमृत महोत्सव साजरा करण्याला अर्थ आहे, असे म्हणत आमदार काळे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT