Krupal Tumane Sarkarnama
विदर्भ

खासदार तुमानेंनी पुरावा म्हणून बोर्डींग पासच ‘सरकारनामा’ला पाठवला, अन् निघाले दिल्लीला..

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत अनुपस्थित असल्याच्या अफवेने रामटेकचे खासदार कृपाल तुमाने सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : आज दिवसभर चर्चा होती ती, मातोश्रीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या खासदारांची. त्यामध्ये विदर्भातील तीन खासदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. तसे वृत्तही काही वाहिन्यांवरून प्रसारित झाले. पण यामध्ये सर्वाधिक चर्चेत होते ते रामटेकचे खासदार कृपाल तुमाने. पण प्रसारित झालेले ते वृत्त खोटे, खोडसाळपणाचे होते, असे खासदार तुमाने यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

दिल्लीच्या (Delhi) निवासस्थानी खासदारांची झालेली तथाकथित बैठक आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत (Mumbai) बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत अनुपस्थित असल्याच्या अफवेने रामटेकचे (Ramtek) खासदार कृपाल तुमाने सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तुमाने यांनी मात्र दोन्ही वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे सांगितले. मुंबईच्या बैठकीला उपस्थित होतो, असे सांगून ते दिल्लीला रवाना झाले. पुरावा पाहिजे का, असे विचारत त्यांनी मुंबई-दिल्ली प्रवासाची बोर्डींग पास ‘सरकारनामा’ला पाठवली.

दोन दिवसांपूर्वी शिंदे समर्थक खासदारांची दिल्ली येथे कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी तुमाने नागपूरला होते. त्यामुळे बैठकीचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करीत आहेत. आपण शिंदे समर्थक असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे ते म्हणाले. आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोणाला समर्थन जाहीर करायचे याकरिता उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बैठक बोलावली होती. या बैठकीला १३ खासदार उपस्थित होते. सहा खासदार अनुपस्थित होते. अनुपस्थितांमध्ये कृपाल तुमाने यांचे नाव जोडल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले होते. तुमाने यांच्याशी संपर्क साधला असता आपण मुंबईत आहो आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थित होतो असे सांगितले.

मी मुंबईला असल्याचा पुरावा पाहिजे असेल तर मुंबईत या, असे ते म्हणाले. सायंकाळी आपण मुंबई येथून दिल्लीला जात आहोत, असे त्यांनी सांगितले. विश्वास बसावा याकरिता त्यांनी मुंबई-दिल्ली विमानाची बोर्डिंग पासही पाठवला. तुमाने रामटेक लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सर्वप्रथम त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री तसेच काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. त्यानंतर किशोर गजभिये यांचा पराभव करून तुमाने दुसऱ्यांचा लोकसभेत दाखल झाले. सर्वात पहिल्या निवडणुकीत अवघ्या नऊ हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला होता. वेळेवर उमेदवारी दिल्यानंतरही निवडणूक कशी लढायची, हे तुमाने यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. असे सांगून उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रशंसा केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT