Waiting for Flights : पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून येत्या मार्च महिन्यात विमान सेवेला प्रारंभ होईल, असा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलाय. विमानतळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळं अमरावतीत विमान तळाचा कायापालट होतोय. काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच विमानतळ पूर्णपणे सुरू व्हावं, यासाठी प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
विदर्भातील अकोला, अमरावती व गोंदिया जिल्ह्यांतील बिसरी विमानतळ गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित आहेत. त्यापैकी अमरावती व बिसरी विमानतळाचा प्रश्न सुटताना दिसत आहे. परंतु नेत्यांची एकजूट नसल्यानं अकोला विमानतळावरून ‘टेकऑफ’ स्वप्नच ठरणार की काय असं चित्र आहे. (MP Navneet Rana says Flights from Amravati Airport to ready to takeoff from Upcoming March Issue of Akola Unsolved)
अमरावती येथे १९९२ मध्ये विमानतळाची स्थापना करण्यात आली होती. शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर डॉ. पंजाबराव देशमुख बेलोरा विमानतळ सध्या उभं आहे. ७४.८६ हेक्टर जागा. ४ हजार ५०० फुटाची धावपट्टी, टर्मिनल बिल्डिंग अशा सुविधा सध्या येथे आहेत. नाईट लँडिंगची सुविधा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी विमानतळ जोडण्याचं काम प्रगतिपथावर आहे. लवकरच अमरावती येथे देशातील सर्वांत मोठे हवाई प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीसोबत बोलणी सुरू आहे. अमरावतीचं भाग्य बदलावं म्हणुन तेथे बरेच नेते सरकारकडं पाठपुरावा करीत आहेत. सध्या अमरावतीकरांना विमानसेवेसाठी उपराजधानी नागपुरात जावं लागतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचाही ‘मेकओव्हर’ झाला. येथे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभं झालय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डान मंत्री असताना त्यांनी गोंदिया विमानतळासाठी पुढाकार घेतला. बिरसीचा चेहरामोहरा बदलल्यानंतर १३ मार्च २०२२ पासून येथे सेवा सुरू झाली होती. परंतु ती सहा महिन्यांतच बंद पडली. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानतळ झालं. खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नाने नोएडाच्या फ्लाय बिग कंपनीन १३ मार्च २०२२ पासून विमानसेवा सुरू केली. परंतु बिरसी विमानतळाकडं जाणाऱ्या मार्गावर कामठा-परसवाडा मार्ग आहे. त्यामुळं ‘रनवे’च्या मार्गात अडचण निर्माण होतेय. विमानतळावर नाईट लँडिंगची सेवाही नाही. कंपन्यांना बिरसी विमानतळ प्राधिकरणाकडुन सहकार्यही मिळत नाही असं नमूद करीत सध्या येथील विमानसेवा बंद आहे. ती लवकरच सुरू होईल यासाठी पटेल आणि मेंढे प्रयत्नशील आहेत.
अकोला येथील शिवणी विमानतळाच्या बाबतीत मात्र प्रचंड राजकीय उदासीनता आहे. अनेक वर्षे आमदार, खासदार, मंत्री राहिलेले नेतेही अकोल्यात विमानतळाचा प्रश्न सोडविण्यात पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत. त्यांनी पाहिजे तसे प्रयत्नच केल्याचं दिसून येत नाही. १९४३ मध्ये शिवणी येथे विमान तळाची स्थापना करण्यात आली. सध्या येथे १ हजार ४०० मीटरची धावपट्टी आहे आणि शोभेची वस्तू बनलेली ईमारत. धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा मुद्दा बऱ्याच काळापासून रखडलाय. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६० एकर जमीन भूसंपादन करण्याबाबत येथे वाद आहे. शिवणी विमानतळ सुरू झाल्यास अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, हिंगोली जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे. सध्या हे विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. परंतु काही उपयोगाचं नाही. केंद्र आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे. त्यानंतरही विद्यापीठ सरकारला ऐकत कसं नाही, हा खरा प्रश्न आहे.
राजकीय एकजुटतेच्या दृष्टीनं अकोल्याचं नशिबच खराब आहे. येथे उड्डाणपूल झाला तो सहा महिन्यात बंद पडला. पूर्णा नदीवरील पूल पहिल्याच पुरात वाहुन गेला. अंडरपास पावसाचं पाणी साचल्यानं अनेक दिवस बंद होता. रेल्वे उड्डाणपुलांचा मुद्दाही कायम आहे. अकोल्यात चालायला धड रुंद रस्ते नाहीत. सर्वच कचऱ्याचे ढिग साचलेय. पिण्याच्या पाण्याची तर अकोल्यात बोंबच आहे. कोणत्याही नेत्याचा पायपोस कुणाच्याही पायात नाही. सत्ताधारी पक्षातच गटबाजी आहे. त्यामुळं अनेक वर्ष आमदार, खासदार, मंत्री राहिलेल्यांनीही अकोल्यासाठी खऱ्या अर्थानं काय केलं असा प्रश्न नागरिक उपस्थित करताहेत. नेत्यांनी सलग अनेक वर्ष पदांवर राहण्याचा रेकॉर्ड केला खरा परंतु मूलभूत सुविधांबाबत अकोला आजही मागास आहे. शिवणीच्या मुद्द्यावरून ही बाब अधोरेखित होतेय फक्त एवढच आहे.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.