Sudhir Mungantiwar and Aditya Thackeray
Sudhir Mungantiwar and Aditya Thackeray Sarkarnama
विदर्भ

मुनगंटीवार खवळले; म्हणाले, यासाठी आपल्या पिताश्रींना लाज वाटली पाहिजे, असे म्हणायचे का?

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी सभागृहात आदिवासी कुपोषित बालकांच्या प्रश्‍नांवर चर्चा सुरू होती. यामध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत (Vijaykumar Gavit) यांनी दिलेल्या उत्तरावर आदित्य ठाकरे यांनी लाज काढली. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) चांगलेच खवळले.

आदिवासी, कुपोषित बालकांवर चर्चा सुरू असताना, एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, असे उत्तर विजयकुमार गावीत यांनी दिले. यावर सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. कुपोषणाने बालमृत्यू होत असताना सरकार जर ही बाब नाकारत असेल, तर हे फार दुर्दैवी आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. तर आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, तर याची लाज वाटली पाहिजे, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. त्यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी तात्काळ आक्षेप घेतला. हा शब्द असंसदीय असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

यापूर्वी आपण अडीच वर्षे सत्तेत होता, त्यामुळे मग यासाठी आपल्या पिताश्रींना लाज वाटली पाहिजे, असे म्हणायचे का, असा प्रश्‍न करून वनमंत्री मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. या विषयावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह इतरही सदस्यांनी मते मांडली आणि उपाययोजना सुचविल्या. अजित पवार यांनी तर उदय सामंत यांना उपाययोजनाही सुचवल्या. पण आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ शब्दांवरून सभागृहात मोठा गदारोळ झाला.

अंधश्रद्धा ही एक मोठी समस्या आमच्या मेळघाटात आहे. ती येवढी प्रबळ आहे की, तेथे उपचार करण्यासाठी भुमक्याकडून (भोंदू बाबा) चटके देऊन उपचार केले जातात. साप चावला असो की अजून कुठली समस्या हे भुमकेच आदिवासी लोकांवर उपचार करतात. त्यांना कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना कळत नाही. येवढेच काय तर एक वेळ माजी आमदाराने उपचार करण्यासाठी भुमक्याकडून चटके घेतले होते. येथे आमदारच अंधश्रद्धेच्या आहारी गेले असतील, तर आदिवासींकडून काय अपेक्षा करायची, असा प्रश्‍न आमदार ठाकूर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT