Nagpur City Congress
Nagpur City Congress Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress News : अंतर्गत वाद मिटला तरच कॉंग्रेसला बलाढ्य गडकरींशी लढणे शक्य !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur City Congress Leaders News : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली. आता कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे आणि मुंबईत आज (ता. २) आणि उद्या (ता. ३) बैठकीचे आयोजन केले आहे. पण नागपूर शहरातील काही ज्येष्ठ नेत्यांना या बैठकीचे निमंत्रणच दिले गेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. (Internal factionalism in the Congress came to the fore once again)

शहर काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना या बैठकीचे निमंत्रणच पोहोचले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद कायम असल्याचे चित्र आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास भाजपसारख्या साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करणाऱ्या पक्षापुढे पक्ष कसा तग धरणार, असा प्रश्न काँग्रेसमधील अनेकांना पडला आहे. प्रदेश काँग्रेसने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी या बैठका आयोजित केल्या आहेत.

मुंबईतील बैठकीत प्रत्येक मतदार संघातील मागील निवडणुकीतील मते, सद्यःस्थिती, विरोधी पक्षाची दुबळी बाजू आदींवर चर्चा होणार आहे. लोकसभा मतदार संघनिहाय नेत्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. नागपुरातील नेत्यांनाही या बैठकीसाठी बोलवण्यात आले. परंतु अनेक नेत्यांना शहर काँग्रेसकडून निमंत्रण मिळाले नसल्याचे सूत्राने नमूद केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी, अशोक धवड, डॉ. नितीन राऊत यांच्यासह तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे पाटील यांनाही निमंत्रण नसल्याचे समजते.

एकजूट नाही, कशा लढणार निवडणुका?

या सर्व नेत्यांचा समावेश माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे समर्थक नसलेल्यांमध्ये होतो. त्याचवेळी मुत्तेमवार यांच्या समर्थकांना मुंबईतील (Mumbai) बैठकीचे निमंत्रण मिळाल्याची माहिती आहे. पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये (Election) काँग्रेस कशी लढणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आव्हान राहणार आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये एकजूट महत्त्वाची आहे. परंतु नेते एकत्र यायला तयार नसल्याचे मुंबईतील बैठकीच्या निमंत्रणावरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील काही नेते प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीवर आहेत. त्यांनाही निमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT