Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंसह भाजपच्या अर्धा डझन आमदारांना मोठा दिलासा, न्यायालयाने केली मोठ्या प्रकरणातून केली निर्दोष मुक्तता

OBC protest case : न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अर्धा डझन आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Rajesh Charpe

  1. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ओबीसी आरक्षण प्रश्नावर नागपूरमध्ये आंदोलन केलेल्या चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या सहा आमदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

  2. कोरोना काळात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

  3. या निर्णयामुळे भाजप नेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून ओबीसी समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.

Nagpur News : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या सहा आमदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय कोर्टाने दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना या सर्व आमदारांच्या विरोधात कोरोना काळात साथ रोग प्रतिबंध कायदा आणि देशामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना आंदोलन केल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी समाजाचे 27 टक्के आरक्षण धोक्यात आले होते. त्यामुळे मोठा असंतोष उफाळून आला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने 31 मे 2021 रोजी राज्यभर आघाडी सरकारच्याविरोधात आंदोलन केले होते. नागपूरच्या संविधान चौकातही कोरोना काळात जमावबंदीचे आदेश धुडकावून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी सुरू होती.

आता या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात पोलिसांना बावनकुळे यांच्यासह भाजपच्या सहा आमदारांविरोधात सबळ पुरावे दाखल करता आलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने यांची निर्दोश मुक्तता केली.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी समाजाचे 27 टक्के आरक्षण धोक्यात आले होते. यामुळे नागपूरच्या संविधान चौकातही कोरोना काळात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. पण धुडकावून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, आमदार टेकचंद सावरकर, भाजपचे पदाधिकारी अरविंद गजभिये, रमेश चोपडे, रितेश राहाटे यांच्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या काळात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ नये असे बंधन घालण्यात आले होते. हे सर्व प्रतिबंधात्मक कायदे धुडकावून भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते.

ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या होत्या. तर उच्च न्यायालयाने आरक्षण फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. या आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुमारे साडेतीन वर्षे लांबल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे 27 टक्के आरक्षण कायम ठेवून निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सर्कल आणि महापालिकेच्या प्रभागांची नव्याने रचना करण्यात आली आहे. पंचायत समिती, नगर पालिका आणि नगर पंचायत सभापतींच्या आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. या दरम्यान, मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला असल्याने आता काँग्रेसने ओबीसीची हक्कासाठी येत्या 10 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

FAQs :

प्र.1: चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला होता?
👉 ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ जमावबंदीचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

प्र.2: किती आमदारांना या प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाली?
👉 एकूण सहा आमदार आणि बावनकुळे यांना न्यायालयाने निर्दोष घोषित केले.

प्र.3: हे आंदोलन कधी झाले होते?
👉 हे आंदोलन कोरोना काळात, उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले होते.

प्र.4: न्यायालयाने काय म्हटले?
👉 पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

प्र.5: भाजपने या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली?
👉 भाजपने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत, हा विजय ओबीसी समाजाचा असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT