Kidnapping Case Nagpur Sarkarnama
विदर्भ

Crime news : नागपूरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अल्पवयीन मुलीसह दोघी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल, युद्धपातळीवर शोधमोहीम

Kidnapping case registered in Nagpur : नागपूरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अल्पवयीन मुलीसह तिची मैत्रीण बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली असून तपास वेगाने सुरू आहे.

Rashmi Mane

नागपूर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अल्पवयीन मुलीसह शहरातील वेगवेगळ्या भागांतून दोघी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल करून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे. हुडकेश्वर आणि बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या पथकांकडून विद्यार्थिनींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

पहिली घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. बारावीत शिकणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी ही उपजिल्हाधिकाऱ्यांची मुलगी आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ती मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली.

मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिचितांकडे शोध घेतला, परंतु तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

दुसरी घटना बेलतरोडी परिसरात घडली. नववीत शिकणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी रविवारी रात्री मैत्रिणीकडे खेळायला जाण्याचा हट्ट करत होती. उशीर झाल्यामुळे वडिलांनी तिला बाहेर जाण्यास नकार दिला. त्यानंतर घरात आजीशी आणि वडिलांसोबत वाद झाला. यात वडिलांनी तिला थप्पड मारल्याचे सांगितले जाते. संतापलेल्या विद्यार्थिनीने, "मला तुमच्याजवळ राहायचे नाही," असे म्हणत घर सोडले. काही वेळाने ती परत आली; मात्र रात्री अकराच्या सुमारास पुन्हा घराबाहेर पडली आणि त्यानंतर परतली नाही.

या दोन्ही घटनांमुळे नागपुरात खळबळ उडाली असून, दोन्ही विद्यार्थिनींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, दोन्ही मुलींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT