Nagpur Graduate MLC Election : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस राजकीय रंगत वाढत आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे, तर भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना मैदानात उतरवले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आक्रमक नेते नितेश कराळे गुरुजी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने या लढतीत नवा ट्विस्ट आला आहे.
नितेश कराळे हे सोशल मीडियावर ‘कराळे गुरुजी’ म्हणून विशेष चर्चेत आहेत. मागील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना सुमारे साडेआठ हजार मते मिळाली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यंदा मात्र त्यांनी अधिक आक्रमकपणे मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.
कराळे गुरुजी आज, 5 ऑक्टोबर रोजी नागपुरात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठी रॅली काढण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांमधून समर्थक नागपुरात दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पदवीधर बेरोजगारी, सरकारी नोकरभरती, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि MPSC पेपरफुटीसारखे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपमध्येही नागपूर पदवीधर मतदारसंघावरून अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपसमोरही बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले आहे.
2020 मध्ये वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करत हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला होता. यावेळी भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
आता नागपूर पदवीधर मतदारसंघातील समीकरणे चांगलीच बदलली आहेत. एका बाजूला काँग्रेसचे अभिजित वंजारी, दुसऱ्या बाजूला भाजपचे सुधाकर कोहळे, तर अपक्ष म्हणून नितेश कराळे आणि अनिल सोले मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार, याची उत्सुकता वाढली आहे. नागपूरच्या या प्रतिष्ठेच्या लढतीकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत कोणकोणते उमेदवार मैदानात उतरतात आणि कोण माघार घेतो, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.