Nagpur and Chandrapur OBC Agitation News : चंद्रपूर आणि नागपूर येथे सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने ओबीसी समाजातील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले आहे. शुक्रवारी (ता. २९) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित या बैठकीत आता सर्वपक्षीय नेत्यांना बोलाविण्यात यावं अशी मागणी होत आहे. (The government took the initiative of the state-wide agitation of the OBC community)
यासंदर्भात कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले आहे. नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र सरकारने केवळ एकाच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविल्याने त्यावर आता आक्षेप घेण्यात येत आहे. ओबीसींच्या उपोषणाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी बळ दिले आहे.
केवळ एकाच पक्षातील नेत्यांना न बोलाविता सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेण्यात यावं, अशी मागणी कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीनं केली आहे. एखाद्या राजकीय पक्षातील नेत्यांना बोलाविण्यावर आपला आक्षेप नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे विविध पक्षांतील ओबीसी नेत्यांनाही आपले म्हणणे मांडता यावे, ही यामागची भूमिका असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांना दिलेल्या निवेदनातून मांडली.
राज्य सरकारने चर्चेसाठी बोलाविलेल्या शिष्टमंडळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समावेश अधिक आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आक्षेप घेतला होता. काँग्रेस पक्षानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशात कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने सर्वपक्षीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविण्याची मागणी केल्याने आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी बोलावायचे झाल्यास कुणाची निवड करायची आणि कुणाला टाळायचे, यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ओबीसी समाजाकडून आलेले निवेदन व त्यांनी केलेली मागणी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला कळविली आहे. सरकारकडून यासंदर्भात उत्तर प्राप्त होताच कळविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या उत्तरानंतर आता ओबीसी समाजातील नेत्यांचे पुन्हा ‘वेट अॅन्ड वॉच’ सुरू झाले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.