Nitin Gadkari and Vikas Thakre Sarkarnama
विदर्भ

Nagpur Lok Sabha Election : नागपुरात गडकरी-ठाकरे थेट लढत, फायदा कुणाला ?

Vikas Thakre : भाजपमधील अनेक नेते त्यांचे दोस्त आहेत. ओबीसी, दलित, मुस्लिम आणि हलबा या काँग्रेसच्या परंपरागत मतांची व्यवस्थित बांधणी केल्यास गडकरींना पराभूत करता येऊ शकते, असे समीकरण सध्या मांडले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Lok Sabha Election : लोकसभेच्या आजवर झालेल्या निवडणुकीकडे लक्ष टाकल्यास भाजपने मतविभाजनाची बारकाईने काळजी घेतल्याचे दिसून येते. बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाजपच निवडतात, अशी शंकाही यापूर्वी व्यक्त केली जात होती. या वेळी मात्र गडकरी म्हणा वा इतर भाजप नेते या भानगडीत पडलेले दिसत नाहीत. त्यामुळे या वेळी नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार, हे स्पष्ट आहे. थेट लढतीचा फायदा कुणाला, याची आकडेमोड सुरू झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपाचा उमेदवार एका माजी नगरसेविकेचा पती आहे. मुस्लिमांची मते घेणाऱ्या ‘एमआयएम' या पक्षाचाही या वेळी उमेदवार नाही. हे बघता मतविभाजन फारसे होणार नाही आणि ही मते काँग्रेसकडे वळती होणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत गडकरी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचा दावा करीत आहेत. मागील निवडणुकीत नाना पटोले यांना दोन लाखांच्या मताधिक्यांनी गडकरी यांनी पराभूत केले होते.

गडकरींच्या तुलनेत युवा असलेले विकास ठाकरे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. ठाकरे शहराचे महापौर होते. सध्या ते आमदार आहेत आणि शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने काँग्रेसची कमान त्यांच्या हातात आहे. ठाकरे यांचा मित्र परिवार मोठा आहे. भाजपमधील अनेक नेते त्यांचे दोस्त आहेत. ओबीसी, दलित, मुस्लिम आणि हलबा या काँग्रेसच्या परंपरागत मतांची व्यवस्थित बांधणी केल्यास गडकरींना पराभूत करता येऊ शकते, असे समीकरण सध्या मांडले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे ठाकरे यांच्यासाठी शहरातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सध्या एकत्र आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने कागदावर मांडलेले समीकरण तंतोतंत प्रत्यक्ष मतदानात उतरल्यास नागपूरमध्ये कडवा मुकाबला होऊ शकतो. नागपूर शहरात सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन मते, विकास कुंभारे आणि कृष्णा खोपडे यांचा समावेश आहे.

विकास ठाकरे निवडून आले, त्या पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजपचा उमेदवार अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला. पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. दीडशेपैकी १०८ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. या निवडणुकीत विकास ठाकरे स्वतः पराभूत झाले होते. नंतर काँग्रेस नगरसेवकांचे दोन गट पडले होते. असंतुष्टांनी प्रचंड विरोध करून विकास ठाकरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत येऊ दिले नव्हते. त्यानंतरही पश्‍चिम नागपुरातून विकास ठाकरे आमदार म्हणून निवडून आले. या वेळी थेट लढतीमध्ये काँग्रेसचे सर्व नेते एकवटल्याने मुकाबला तगडा होणार असल्याची चिन्हे आहेत.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT