Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur : आमदार साहेब लग्नासाठी मुलगी बघा; कारण मी शेतकरी म्हणजे फेकलेला जीव !

MLA : एका तरुणाने चक्क लोकप्रतिनिधींना फोन करत मुलगी पाहण्याची विनंती केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District News : सध्या लग्नाचा प्रश्न हा खूपच अवघड होत चालला आहे. चांगले शिक्षण, नोकरी असूनही अनेक तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. त्यात शेतकरी नवरा नको ग बाई, अशी अनेक मुलींची भूमिका असते. त्यामुळे अनेक युवक चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत असूनही लग्न जुळत नसल्याने त्रस्त आहेत.

कुही तालुक्यातील एका युवकाने चक्क उमरेड विधानसभा क्षेत्रात आजी- माजी आमदारांसह इच्छुकांनाही मुलगी पाहण्याची विनंती केली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. लग्न जुळत नसले तर मित्र परिवाराला, नातेवाइकांना, जवळच्या व्यक्तींना मुलगी आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र कुही तालुक्यातील एका तरुणाने चक्क लोकप्रतिनिधींना फोन करत मुलगी पाहण्याची विनंती केली आहे. याची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही, हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे.

दरम्यान आता अशाच एक लग्नाळू तरुणाला मुलगी मिळत नसल्याने त्याने चक्क लोकप्रतिनिधीला फोन लावून, तुमच्या मतदारसंघात मुली पाहा अशी गळ घालताना तो दिसत आहे. सोबत पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांना आपण मुलगी पाहण्यासाठी विनंती केल्याचेही तो सांगत आहे.

घरी सर्व काही चांगले आहे. आठ एकर शेती आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दुःख अमोल नामक तरुणाने व्यक्त केले. तर हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही. तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना, अशी मागणी केली. यावर लोकप्रतिनिधींनीदेखील तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले, हे विशेष.

वेळीच लग्न न जुळणे ही मोठी सामाजिक समस्या ठरत आहे. विशेष करून शेती करणाऱ्या लग्नाळू मुलांसाठी. यासाठी आता समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. नोकरी न मिळणे ही फार मोठी समस्या आहे. यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस निघण्याची शक्यता आहे. सरकारने बेरोजगारीवर काही उपाय योजना केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. सध्या तरी सरकारचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही समस्या अधिकच जटिल झाली आहे.

राजानंद कावळे, शेतकरी व कामगार नेते.

सध्या शेतकरी (Farmer) मुलाला कोणाही विचारीत नाही. शेती कितीही असली तरी त्याकडे पाहण्याचा मुलींकडच्या लोकांचा वेगळाच दृष्टिकोन आहे. शेतकरी म्हणजे प्रवाहातून बाहेर फेकलेला जीव आहे. सध्या शेतीची जी दुरवस्था झाली आहे, त्याचा सरकार (Government) जबाबदार आहे. सरकारचे धोरण शेतीयोग्य नसल्यामुळे ग्रामीण भागात ही समस्या गंभीर झाली आहे. शेती करतो म्हटल्यावर मुलीकडून नकारघंटा येते. मग तुमचे शिक्षण कितीही असो. आम्ही तरुणांनी (Youth) काय करावे?

-अमोल, इच्छुक वर, कुही (जि. नागपूर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT