OBC Morcha Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur OBC Morcha : फडणवीसांच्या शब्दावर नाही भाजप नेत्यांनाच विश्वास, धडक मोर्चात झाले सहभागी !

Atul Mehere

Nagpur Political News : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खल सुरू आहे. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ केल्याने आपल्या आरक्षणावर गदा येईल, अशी भीती ओबीसी समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातील ओबीसी समाजाने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. (A food sacrifice movement was also held in Chandrapur)

चंद्रपूर येथे अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले. उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरातही ओबीसी आक्रमक आहेत. संतप्त झालेल्या ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. आंदोलनस्थळाला भेट देत त्यांनी ओबीसी प्रवर्गातील आरक्षणात कुणीही वाटेकरी नसेल असा शब्द दिला.

फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा रविवारचा दिवस ठिकठिकाणी हेच सांगण्यात गेला की, ओबीसी (OBC) प्रवर्गातील आरक्षण काही झाले तरी कमी होणार नाही. परंतु फडणवीस यांच्या या शब्दांवर त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा विश्वास नाही काय, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. हे चित्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सोमवारी दिसले.

ओबीसी समाजाचे वसतिगृह, त्यांच्यासाठी असलेल्या योजना, घरकुलांची उभारणी आदी सर्व बाबींवर फडणवीस स्पष्टपणे बोलले. त्यानंतर कदाचित ओबीसी समाज त्यांचे आंदोलन थांबवेल, असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. विशेष म्हणजे सोमवारी (ता. १७) नागपुरात (Nagpur) काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपचेच नेते सहभागी झाल्याने त्यांचा आपल्या नेत्याच्या शब्दावर विश्वास नाही का, अशी चर्चा सुरू झाली.

नागपुरातील संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी समाजाच्या नेत्यांसह भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे आघाडीवर दिसले. नागपुरातील जे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यात डॉ. फुके यांचेही नाव घेतले जाते. माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार प्रवीण दटके यांचादेखील मोर्चात सहभाग होता.

त्यामुळे फडणवीस यांनी एक दिवस अगोदर नागपुरात दिलेल्या शब्दाला काहीच किंमत नाही का, अशी चर्चा मोर्चास्थळी सुरू होती. भाजपच्या नेत्यांचा त्यांच्याच पक्षावर व त्यांच्याच नेत्याने दिलेल्या ग्वाहीवर विश्वास नसेल तर समाजाने तरी त्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा जणू संदेशच या मोर्चाच्या निमित्ताने दिला गेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईनंतर मराठा समाजातील आंदोलनं तूर्तास काहीशी शांत झाली आहेत. अशात ओबीसी आंदोलनांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी होईल की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT