नागपूर : शिवसेनेमध्ये असताना ओबीसींसाठी काही ठोस करू शकत नव्हतो, ही खंत होती. त्यामुळेच तेव्हा अगदी जिवावर उदार होऊन मी शिवसेना सोडली. ही गोष्ट नागपूरकरांना चांगली माहिती आहे. तेव्हा मी नागपुरात असताना जिल्ह्यातील कोराडी आणि इतर भागात भरपूर फिरलो, असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल, समता परिषद यांच्या गडचिरोली येथील मेळाव्यासाठी छगन भुजबळ आज नागपुरातून रवाना झाले. त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, राज्यात कुणाला काम करू द्यायचे नाही, अगदी नामोहरम करून सोडायचे, या भावनेतून हे काम सध्या केले जात आहे. सरकार केव्हा पडेल, हे कुणाला माहितीही पडणार नाही, असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परवा केली होते. त्याचा समाचार घेताना मंत्री भुजबळ म्हणाले, ते काय करतात, हे आम्हाला माहिती पडते. आम्हाला काही कळत नाही, या भ्रमात त्यांनी राहू नये.
मागे त्यांनी सकाळीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच आम्ही त्यांचा बंदोबस्त केला. आताही सरकार पाडण्यासाठी ते काही करतील आणि आम्ही गप्प बसून बघत राहू असे होणार नाही. तर यावेळीही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू. जोपर्यंत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे सोबत आहेत. तोपर्यंत हे सरकार पडणार नाही आणि आता आम्ही घट्ट पाय रोवून आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात नुकतेच केले. त्यावरून विरोधकांनी काय ते समजून घ्यावे, असा चिमटाही भुजबळ यांनी घेतला.
रेशनवरील धान्य वितरणातातील घोटाळ्याची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धान्य तस्करीत गुंतलेल्या नागपुरातील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. आधी त्याची चौकशी करू त्यामध्ये थोडाही संशय वाटला तर कारवाई केली जाईल. कारण दिल्लीतून कुणाला पाठवले आणि केली कारवाई, असे आमच्या सरकारमध्ये होत नाही, येथे लोकशाही आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला टोला हाणला.
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर ज्या पद्धतीने राज्याचे मंत्री, त्यांचे नातेवाईक यांच्या विरोधात केला जात आहे. राज्यातील जनता याकडे बारकाईने लक्ष देत आहे. भाजपबद्दल लोकांनी मने कलुषित होत चालली आहे. त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. हा विचार कारवाई करणाऱ्या यंत्रणा नाही करणार. तर याचा विचार फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासू नेत्यांनी करायला पाहिजे, कारवाई करणारे अधिकारी तर खासगीत सांगतात, की वरून आदेश आहे. कारवाई मंत्र्यांवर होत असली तरी सामान्य जनताही आता ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचा विरोध करीत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.