Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : नाना आणि मोदी एकाच मंचावर, नानांना शिव्या दिल्याची मोदीने दिली कबुली !

Abhijit Ghormare_Guest

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जानेवारी २०२२ मध्ये ‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारूही शकतो’, असे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले होते. ज्या मोदीबाबत नाना बोलले होते, तो मोदी आणि नाना पटोले आज लाखांदूर येथे एकाच मंचावर आले.

नानांनी (Nana Patole) ते वक्तव्य केल्यानंतर भाजपने (BJP) त्यांच्या विरोधात रान उठवले होते. त्याच्या काही दिवसांनंतर ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल नव्हे, तर गावगुंड मोदीबाबत बोललो होतो’, असा खुलासा नाना पटोले यांनी केला होता. त्याच्या काही दिवसांनंतर ॲड. सतीश उके यांनी गावगुंड मोदीला नागपूरच्या (Nagpur) प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसमोर आणले होते. त्यानंतर कुठे हा विषय थंड होत गेला. पण आज तोच मोदी आणि पटोले एकाच मंचावर आल्याने त्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा झाली.

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरमध्ये आज काँग्रेसतर्फे रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात गावगुंड मोदी आणि नाना पटोले एकाच व्यासपीठावर दिसल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या. या रोजगार मेळाव्याला गावगुंड मोदी ऊर्फ उमेश घरडे चक्क समोर व्यासपीठावर नानांसोबत बसलेला दिसल्याने चर्चांना उधाण आले. त्यामुळे ज्याला मारण्याच्या बाता करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत होते, त्याच गावगुंड मोदीला नाना पटोले यांनी निमंत्रण दिले का, याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जेवनाळा येथे एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "आपण मोदीला मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले होते. हा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल होताच नाना पटोले यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होऊ लागला होता. दरम्यान नाना पटोले यांनी आपण लोकांना त्रास देणाऱ्या गावगुंड उमेश घरडे ज्याला मोदी म्हणतात आणि त्याच्याबाबत असा उच्चार केल्याचा खुलासा करत प्रकरणावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर अचानक गावगुंड मोदी गायब झाल्याने विविध चर्चांना पेव फुटले होते. आज लाखांदुरात काँग्रेसतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात आणि तेसुद्धा चक्क व्यासपीठावर तोच मोदी उपस्थित दिसल्याने पुन्हा एकदा विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान आपण गावगुंड मोदीला निमंत्रण दिले नसल्याचा खुलासा नाना पटोले यांनी केला. आपण केवळ नाना पटोले यांना भेटण्यासाठी आल्याचे गावगुंड मोदी ऊर्फ उमेश गरडे याने माध्यमांना सांगितले. निवडणुकीदरम्यान नाना पटोले यांना आपण धमकी दिली होती, असेही तो म्हणाला. दरम्यान एकाच व्यासपीठावर नाना आणि मोदी एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा त्या बहुचर्चित जुन्या प्रसंगाची आठवण ताजी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT