Nana Patole Sarkarnama
विदर्भ

नानांनी भंडारा पोलिसांना लावले ‘काम’धंद्याला, सुरू झाला ‘त्या’ मोदीचा शोध...

‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा युक्तिवाद करून घूमजाव करत नानांनी (Nana Patole) आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

Abhijeet Ghormare

भंडारा : काल भंडारा (Bhandara) जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे. राष्ट्रीय पातळीवर नानांना करडा विरोध सुरू झाला आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा युक्तिवाद करून घूमजाव करत नानांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो यशस्वी होताना दिसत नाही. त्यांनी स्वतःची पुरती गोची करून घेतली आहे. पण त्यांच्या या वक्व्याने भंडारा पोलिसांना (Police) कामधंद्याला लावले आहे आणि त्यांनी मोदीचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.

लोकांनी गावगुंडाची तक्रार माझ्याकडे केल्याने मी त्याला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असे म्हटले. यात काय गैर आहे, असा सवालही नानांनी केला आहे. मात्र नानाच्या या बोलण्याने भंडारा पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून भंडारा जिल्ह्यात इतका मोठा गुंड कार्यरत असताना भंडारा पोलिसांनी आजपर्यंत त्याच्या शोध का घेतला नाही, कारवाई का केली नाही. पोलिसांच्या शासकीय अधिकृत लेखात इतक्या मोठ्या गुंडाची नोंद का केली गेली नाही, हाच मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आता स्वतः नाना पटोले यांनी संबंधित गावात इतका मोठा गुंड 2 वर्षांपासून सक्रिय असल्याचे सांगितल्यानंतर भंडारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्‍नचिन्ह लागले आहे. पण भंडारा पोलिस मात्र बुचकळ्यात पडले आहेत.

नानांच्या आक्रमक शैलीमुळे काँग्रेस हायकमांडनी नानांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. नानाही या पदाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मोदींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नानांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. देशभर वादंग निर्माण झाले असून विरोधकांना नानांनी आयते कोलीत दिले आहे. त्यामुळे इतक्या लवकर तरी हे वादळ शमेल, असे वाटत नाही. पंजाबमधील घडलेल्या घटनेनंतर मोदींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न देशभरात चर्चिला गेला. त्यानंतर वाद सुरू झाला असताना नानांच्या व्हिडिओने आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे. आता भंडारा पोलिस आणि भाजपवाले या मोदी नावाच्या गुंडाला शोधण्याच्या कामी लागले आहेत.

नानांनी स्वतःच त्या गुंडाबद्दल खुलासा केला तर भाजप आणि पोलिस दोघांचेही परिश्रम वाचणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्तेही तो मोदी नावाचा गावगुंड कोण आहे, हे जाऊन घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. पोलिसांसाठी नाही, पण किमान आपल्या कार्यकर्त्यांसाठी तरी नानांनी खुलासा करावा, असे बोलले जात आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच भंडारा जिल्ह्याला व्हायरल व्हिडिओचे ग्रहण लागले आहे की काय, असे वाटत आहे. अगदी १ जानेवारीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांचा पोलिस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ते प्रकरण अद्याप शांत झालेच नाही, तर काल नाना पटोलेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. देशभरात नानांना करडा विरोध होऊ लागला आहे. नववर्षाची सुरुवात भंडारा जिल्ह्यातील काही नेत्यांसाठी चांगली झाली नाही, हे मात्र खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT