Nana Patole, Ajit Pawar and Amol Mitkari
Nana Patole, Ajit Pawar and Amol Mitkari  Sarkarnama
विदर्भ

‘दादापेक्षा नाना मोठा’ : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद रंगला...

जयेश गावंडे

अकोला : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा या गावात प्रचार सभेत ‘दादापेक्षा नाना मोठा’, असे विधान करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना टोला हाणला. दुसऱ्या कुठल्याही दादांपेक्षा ते मोठे असुच शकत नाही, असे प्रत्युत्तर आमदार मिटकरींनी पटोलेंना दिले. कोण नाना अन् कोण दादा, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल, असे अप्रत्यक्ष आव्हानही त्यांनी पटोलेंना दिले.

सध्या अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी 5 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी जिल्ह्यात विविध पक्षांच्या उमेदवारासाठी प्रचार सभा सुरू आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अधिक आरक्षण होत असल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त ठरविण्यात आल्या. त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत 5 ऑक्टोबरला मतदान व 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 14 रिक्त गटांसाठी, तर पंचायत समितीच्या 28 गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

प्रचार मोहिमेला सुरुवात झाली असून नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली. त्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये उलटसुलट चर्चादेखील रंगली. अखेर काँग्रेस पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेत स्वतंत्रपणे आपले उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात नाना पटोले यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेदरम्यान नाना पटोले यांनी अजित पवार यांना टोला लगावला ‘माझं नाव नाना पटोले असून मी जे बोलतो तेच करतो, दादा पेक्षा नाना मोठा असतो’ असे ते म्हणाले. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला. तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गावातच नाना पटोले यांनी ‘दादा पेक्षा नाना मोठा’ असल्याचे म्हटले. दरम्यान या संदर्भात अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले. नाना पटोले हे मोठे नेते आहेत. त्यांनी कोण्या अर्थाने हे म्हटलं हे मला कळलं नाही. पण मला माझा पेक्षा लहान तरुण वर्ग मला आदराने दादा म्हणतो. माझ्यापेक्षा ते मोठे आहेत. मात्र इतर कुठल्या दादांपेक्षा ते मोठे असूच शकत नाहीत. हे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला हे चांगलं माहीत असल्याचे उत्तर मिटकरी यांनी दिले. मात्र कोण मोठं हे येणाऱ्या निवडणुकीत नक्की माहीत पडेल, असे अप्रत्यक्ष आव्हानही त्यांना नाना पटोले यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT