Pravin Kunti Patil - Nana Patole
Pravin Kunti Patil - Nana Patole  Sarkarnama
विदर्भ

कुंटे पाटलांचा पलटवार, मंत्रिपद न मिळाल्याने नानांनी मानसिक संतुलन गमावलं...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आणि ऊर्जा मंत्रालय देण्याची कमिटमेंट झाली होती. प्रदेशाध्यक्षपद तर मिळाले, पण त्यांची मंत्रि‍पदाची अभिलाषा पूर्ण झाली नाही. अन् नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यामुळेच ते काहीच्या बाही विधाने करीत सुटले आहेत, असा पलटवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दुकान बंद पडण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंचे साकोलीचे दुकान बंद पाडू, असा घणाघाती प्रहारही कुंटे पाटलांनी केला. नाना पटोलेंच्या ‘दुकान बंद’च्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या. त्यावर ‘शरद पवारांच्या ‘त्या’ मुद्द्याला आम्ही महत्व देत नाही’, असे विधान नाना पटोलेंनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना कुंटे पाटील म्हणाले, खरं पाहिलं तर बुलडाण्यात ‘राष्ट्रवादीचं दुकान बंद पडणार’, हे म्हणतानाच त्यांच्यातील वैफल्य, निराशा जाणवली. त्यानंतर शरद पवारांनी जे उत्तर त्यावर दिले, त्यानंतर त्यांचा चांगलाच तिळपापड झाला आणि त्या नैराश्‍यातूनच त्यांनी पवारांबद्दल आजचे वक्तव्य केले.

नाना पटोलेंना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले, पण मोठा कालावधी उलटूनही मंत्रिपद मिळालेले नाही आणि नजीकच्या काळात तशी शक्यताही दिसत नाहीये. हायकमांड सोनिया गांधी यांच्यावर ते राग काढू शकत नाहीये. त्यामुळे ते असे असंतुलित विधाने करीत सुटले आहेत, या निष्कर्षावर आम्ही येऊन पोहोचलो आहोत. नानांना राजकीय निराशा आली आहे, हे त्यांच्या विधानांवरून नेहमी जाणवते. आजही त्यांनी पवारांबद्दल बोलून त्याच निराशेचा परिचय दिला, असल्याचे कुंटे पाटील यांनी सांगितले.

शरद पवारांच्या कुठल्याही विधानाला राज्यातच नाही, तर देशाच्या राजकारणात मोठे महत्व आहे. कुठलेही विधान ते हवेत करत नाहीत, तर त्याच्या मागे त्यांचे प्रगल्भ विचार आणि प्रदीर्घ अनुभव आहे. अशा पवारांबद्दल बोलताना नानांनी थोडे तरी तारतम्य बाळगायला हवे. पण हे त्यांना अद्याप कळलेले दिसत नाही. आतातरी नाना भाऊंनी पवार साहेबांच्या बोलण्याला गांभीर्याने घ्यावे आणि आपल्या बोलण्यात सुधारणा करावी, असा सल्लाही प्रवीण कुंटे पाटील यांनी पटोलेंना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT