Nagpur News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक एजंट आहेत. त्यांनी भाजपच्या अनेक उमेदवारांशी साटेलोटे केले. त्यामुळेच आपला पराभव झाल्याचा थेट आरोप संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी केला. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) समीक्षा बैठकीतच खळबळ उडाली होती.
मध्य नागपूर मुस्लिम आणि हलबा समाज बहूल आहे. हलबा समाजाला उमेदवारी नाकारल्याने मोठ्या प्रमाणात समाज भाजपवर नाराज होता. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडूण येण्याची कुठल्याची शक्यता नव्हती. राजकीय व धार्मिक समीकरणे काँग्रेसच्या बाजूने होते. यानंतरही आपला अकरा हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.
गुरुवारी सर्व पराभूत उमेदवारांची बैठक मुंबई येथील टिळक भवन येथे बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, प्रफुल गुडधे, गिरीश पांडव यांच्यासह अनेक उमेदवार उपस्थित होते. यावेळी बंटी शेळके यांनी थेट नाना पटोले यांच्यावरच तोफ डागली.
मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी रोड शो केला. मात्र, या रोड शोला नाना पटोले उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेते असतानाही पटोले यांनी येथे येण्याची तसदी घेतली नाही. मध्य नागपूरमध्ये प्रचाराला काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नाही, याचीच अधिक काळजी त्यांनी घेतल्याचा हल्लाबोलही शेळके यांनी यावेळी केला.
मागील निवडणुकीत आपण अवघ्या चार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते. यानंतरही प्रदेशाध्यक्षांनी उमेदवारीसाठी आपले नाव पॅनेलमध्ये टाकले. इच्छुक उमेदवारांमधून त्यांचे नाव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत जाऊ दिले नाही. शेवटी राहूल गांधी यांनी यात हस्तक्षेप केला आणि आपल्याला तिकिट दिले. हे नाना पटोले यांना पटले नाही. त्यांनी आपले काही खास नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना मदत केल्याचाही आरोप शेळके यांनी केला आहे.
बंटी शेळके एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी काँग्रेसच्या भरबैठकीत पटोले यांच्यावर तिकीट विकल्याचाही आरोप केला. आपल्याला राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली होती. मी शेळके कुटुंबाचा नव्हे तर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. पंजा चिन्हावर लढलो, असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आणि भाजप उमेदवाराच्या विरोधात एकट्याच्या बळावर निवडून लढावी लागली, असंही ते म्हणाले.
प्रचाराला संघटना नव्हती. नेत्यांना प्रचारासाठी प्रदेशाध्यक्षांनी पाठवले नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले एकदाही मध्य नागपूरमध्ये प्रचारासाठी आले नाहीत. कुठलीही मदत केली नाही, अशा शब्दात बंटी शेळके यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पटोले यांच्यावर शरसंधान साधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.