Nana Patole On BJP Sarkarnama
विदर्भ

Nana Patole On BJP : नाना पटोलेंचा 'BJP'विरुद्ध तिखट मारा; नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार

Nana Patole criticized Ravindra Waikar case : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी दिलेल्या क्लीन चिटवरून भाजपला चांगलेच सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह राज्यातील महायुती सरकारवर तोंडसुख घेतले.

Pradeep Pendhare

Nana Patole : "शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चीट देणे म्हणजे, भाजपच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी आणि सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हा देश पाहत आहे.

अशी एखादी घटना समजू शकतो, पण अनेक उदाहरणे आहेत. वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत", असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी भाजपच्या (BJP) स्वार्थी राजकारणावर तुटून पडले. वायकर प्रकरणावर फारसे बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देऊन फाईल बंद केली, यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे नाना पटोले म्हणाले.

फडणवीस कृतीच करत नाहीत

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर नाना पटोले (Nana Patole) यांनी संताप व्यक्त केला. राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही, परिस्थिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. ससून रुग्णालयात उपचाराच्यानावाखाली आरोपींना फाइव्हस्टार व्यवस्था दिली जाते. प्रशासन आणि पोलिस कुठे आहे हे कळत नाही. नागपूरमध्येही राम झुलावर मद्यधुंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना झाली. ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे या आरोपींना लागलीच जामीन मिळाला. धनदांडग्या घरातील आरोपींना कसलीच भीती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिम्मत होते, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

शिंदे, फडणवीस आणि पवारांची हिट विकेट ठरणार

दोन वर्षापूर्वी आम्हीही विकेट काढली होती,या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी 70 दिवसानंतर खरी मॅच सुरु होणार आहे. दोन वर्षापूर्वी जे झाले तो लपवाछपवीचा, खोक्यांचा खेळ होता. आता खरा सामना जनतेच्या दरबारात होईल. जनतेची काळजी नसलेले मुख्यमंत्री आहेत. अदानीसाठी काम करणाऱ्या खोके सरकारचा जनताच कॅच घेणार असून या मॅचनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही हिट विकेट ठरेल, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

‘मुंह मे राम दिल मे नथुराम’

दीक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. सरकार काही बांधकाम करत असेल आणि आस्था व जनभावनेला धक्का लागत असेल, तर विरोध होणारच. जनभावना आणि आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे. पण सरकार आस्था आणि जनभावनेला किंमत देत नाही. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे पुतळे या सरकारने हटवून एका कोपऱ्यात बसवले. हे सरकार दिशाभूमीत काही चांगले करेल, यावर लोकांचा विश्वासच म्हणून तो जनप्रक्षोभ आपल्याला दिसून आला. 'मन की बात', करणारे सरकार असल्याने जनतेच्या श्रद्धा, जनभावनेला कुठलीची किंमत नाही. दीक्षाभूमीवर परवा जी घटना घडली हा त्याचाच परिपाक आहे, भाजपची कार्यपद्धती ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’ हीच आहे, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT