Nana Patole on Vidhan Bhavan Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : आमदारकी रद्दच्या निर्णयावरून नाना पटोलेंची तीव्र नाराजी, म्हणाले विधिमंडळाला...

प्रसन्न जकाते

Sunil Kedar Case : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी (NDCCB) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा व 12.50 लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर काँग्रेसचे नागपुरातील दिग्गज नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रविवारी (ता. 24) रद्द करण्यात आली.

शुक्रवारी (ता. 22) या खटल्याचा निकाल लागल्यानंतर सोमवारपर्यंत (ता. 25) सलग तीन दिवसांच्या सुट्या असल्याने कदाचित मंगळवारी आमदारकीच्या मुद्द्यावर निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच रविवारीच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मात्र या निर्णयानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याबाबतची अधिसूचना विधिमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आली, त्याबाबत पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पटोले म्हणाले, कोणत्याही लोक प्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते, अशी तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात आहे. परंतु रविवार असतानाही सदस्यत्व रद्द करण्याची घाई का करण्यात आली, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

देशामध्ये दोन कायदे निर्माण झाले की काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. भाजपाचे गुजरातमधील खासदार नारणभाई काछडिया यांना उच्च न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांची खासदारकी लगेच रद्द करण्यात आलेली नाही.

काछडिया यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा वेळ दिला गेला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली गिली. देशातील इतर राज्यात भाजपा आमदारांची अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वाट पाहिली गेली आहे. काँग्रेस किंवा विरोधी पक्षांचा विषय आला की तेव्हा मात्र सरकारला एकदम कायद्यातील सक्तपणा आठवतो, असे नाना पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुनील केदार यांच्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना वरच्या न्यायालयात जाण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. पण केदार यांच्या प्रकरणात आज रविवार असतानाही तातडीने विधानसभा सदस्य रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. सदसत्व रद्द करण्याची विधानभवनाला एवढी काय घाई होती, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

भाजपाचे लोक गुजरातच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये धुतले जातात. त्यांचेच नेते हे तथ्य सर्वांना सांगतात. ही प्रथा देशात आणि महाराष्ट्रात सुरू झाली आहे, ती जास्त दिवस चालणार नाही. सुनील केदार हे वरिष्ठ न्यायालयात लढतील व त्यांना न्याय मिळेल असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT