Ashok Chavan and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : नाना माझं ऐकतात; असं म्हणत ‘बिहाईंड त सीन’ काय घडलं, हे अशोकरावांनी सांगितलं !

Ashok Chavan : विदर्भातील दोन्ही जागा आम्ही उत्तम रितीने निवडून आणल्या.

सरकारनामा ब्यूरो

Ashok Chavan News : राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. या दोन्ही ठिकाणी तिकीट देण्यावरून चांगलेच महानाट्य घडले. यामध्ये पडद्यामागे काय काय घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सांगितली ‘बीहाईंड द सीन’ कहाणी.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा काल सायंकाळी नागपूरनजीकच्या महादुला येथे पार पडला. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबालेंच्या बाबतीत सांगायचं झालं, तर ही जागा आमची अतिशय चांगल्या पद्धतीने आली. विदर्भातील दोन्ही जागा आम्ही उत्तम रितीने निवडून आणल्या.

अडबालेंचा प्रश्‍न जेव्हा आला, तेव्हा बबनराव तायवाडें, सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांचे मला कॉल आले. त्यांनी मला सांगितले की, आता लक्ष दिले पाहिजे. नाहीतरी काही वेगळं घडू शकतं. मग मी नाना पटोलेंना कॉल केला आणि त्यांना नागपुरातील परिस्थिती सांगितली. नाना ऐकत नाही, असं काही नाही. ते ऐकतात, तुमचं ऐकतात की नाही, ते माहिती नाही. पण माझं नाना ऐकतात. पण नानांना समजावून सांगण्याची पद्धत जरा व्यवस्थित असली पाहिजे.

मी नानांना सांगितले की ही जागा (सुधाकर अडबाले) निवडून येऊ शकते. तिकडे आपल्या लोकांचे काय चालले आहे, हे जरा बघा. सर्वांनी नानांना सांगितले की, येथे सुधाकर अडबाले हेच उमेदवार म्हणून आम्हाला पाहिजेत. कारण ते निवडून येऊ शकतात. त्याप्रमाणे नानांनी ऐकले आणि सुधाकर अडबाले यांनी तिकीट दिली. अडबाले निवडून आले.

नाशिकमध्येही जमलं असतं..

हीच स्थिती आमची नाशिकमध्येही होती. तिथेही तिकीट द्यायला आम्ही तयार होतोच. तेथील लोकांना ऐकायला हवे होते. नाना (Nana Patole) असो किंवा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असो. आमच्याकडे तसे काहीही नाही. तेव्हा कॉंग्रेसमध्ये जे वाद दाखवले गेले, ते म्हणजे पेल्यातलं वादळ होतं. थोडंफार मागेपुढे झालं असतं आणि तीही जागा आमची निवडून आली असती. पण ते होऊ शकले नाही. विदर्भातील आमच्या दोन्ही जागा दणकेबाजपणे निवडून आल्या.

विदर्भात पाळंमुळं अजूनही घट्ट..

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चांगला विजय मिळाल्यामुळे आमचं मनोबल वाढलं आहे. विदर्भात कॉंग्रेस पूर्वी होती, तशीच आहे. पाळंमुळं जशी होती, तशीच ती आजही घट्ट आहे. आता फक्त थोडा जोर लावण्याची गरज आहे. कॉंग्रेसचे ते जुने दिवस आता फार लांब नाही. त्यामुळे सर्वांनी अजून थोडा प्रयत्न करण्याची गरज आहे. विदर्भाने अडचणीच्या काळात कॉंग्रेसला नेहमीच साथ दिली आहे, ती आताही मिळेल, अशी अपेक्षा अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT