Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : नानांचं ठरलंय... समोरील तगडा उमेदवार पाहून लोकसभा लढणार, मात्र...

Sunil Mendhe : सध्या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे खासदार सुनील मेंढे करीत आहेत.

अभिजीत घोरमारे

Nana Patole News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार स्वरूपात उभे राहतील का? याचे स्पष्ट उत्तर नाना पटोले यांनी गोंदियात दिले. नानांचं ठरलंय.. आपल्या समोरील तगडा उमेदवार पाहून लोकसभेत उभे राहणार असल्याचे नाना पटोले यांनी सूतोवाच केले आहे. त्यामुळे नानांच्या दृष्टिकोनातून तगडा उमेदवार कोणता, हे मात्र अद्याप त्यांनी स्पष्ट केले नाही.

लोकसभा निवडणुकीचे पडघम केव्हाही वाजू शकतात. कुठल्या मतदारसंघातून मैदानात उतरायचे, हे अद्याप निश्चित केले नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लढायचे की नागपूर लोकसभा मतदारसंघातून याचा निर्णय मी महायुतीकडून कोणता तगडा उमेदवार मैदानात उतरविला जातो, हे पाहून घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.

या कार्यक्रमात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, आमदार सहषराम कोरोटे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना काळे उपस्थित होत्या. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सध्या काही नावांची चर्चा आहे. या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार चालत नाही. मतदारच बाहेरचे पार्सल वापस पाठवतील, असा टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुणाचेही नाव न घेता लावला. फेब्रुवारी संपताच कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते, अशी एकंदरीत स्थिती निर्माण झाली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण असल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सध्या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे खासदार सुनील मेंढे करीत आहेत. पक्ष ‘सिटिंग-गेटिंग’ हे सूत्र लावते की ‘नवा गडी, नवा राज’, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांची जोरदार मोर्चेबांधणी सध्यातरी हेच सांगत आहे.

सध्या महायुतीमुळे या मतदारसंघातील समीकरणावर परिणाम होणार आहे. महायुतीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मतदारसंघावर दावा करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अद्याप मौन बाळगले असले तरी जिल्ह्यात त्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महायुतीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो अंतिम राहील, असे ते सांगत आहेत. काँग्रेसकडून सध्या प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले वगळता कुणाचेही नाव पुढे करण्यात आलेले नाही. येत्या 8 ते 10 दहा दिवसांत हे सर्व स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचेही इच्छुक उमेदवार दिल्ली वाऱ्या करताना बघायला मिळत आहेत. त्यापूर्वीच इच्छुकांनी सभा, बैठका आणि मेळाव्यांचे सत्र सुरू केले आहे. त्यातून ते मोर्चेबांधणी करीत असल्याचे चित्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आहे. या सर्व घडामोडीत जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत कार्यक्रम, मेळावे, भूमिपूजनाचा सपाटाच लावला आहे. या सर्व घडामोडीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या उमेदवारीबाबत स्पष्ट सूतोवाच केल्याने नाना पटोले नागपुरातून निवडणूक लढू शकतात, अशा चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT