Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत अन् त्यांच्या मित्रांचा फायदा करून देतात !

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole on BJP Government : भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा हाती पीक येते, तेव्हाच आयात शुल्कात कमी करून मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि शेतकऱ्यांना दर नाही मिळाला पाहिजे, यांच्या व्यापारी मित्रांना फायदा झाला पाहिजे, असे यांचे धोरण असते, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आज सकाळी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडलेला आहे. त्याला कीड लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. कापूस, तूर, धान, कांदा या सर्व पिकांवर आघात करण्याचे काम भाजप करत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच आम्ही असे ठरवले आहे की जे जे भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील, त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊ.

भाजपने लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली आहे. न्यायव्यवस्था आणि प्रशासनामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आणि मांडलेली आहे. त्यामुळे भाजप विरोधातल्या सर्व लोकांना, राष्ट्रीय पक्षांना सोबत घेऊन देशाचे संविधान आणि देश वाचवण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतलेलीच आहे. जे जे या विचाराने सोबत येतील, त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे.

शहरांची नावे बदलवल्याने शेतकऱ्यांचा फायदा, बेरोजगारांचा फायदा महागाई कमी होत असेल, तर सर्व शहरांची नावे बदला. मात्र मानवी गरजांकडे दुर्लक्ष करून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका एकत्रित लढणार आहात आणि प्रचार सभाही एकत्रित घेणार का, या प्रश्‍नावर पटोले म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो आहे. तेव्हा भाजप लोकशाहीमध्ये जी क्रूरता निर्माण करत आहे, त्या विरोधात एकत्रित लढण्यास आमचा कोणालाही विरोध नाही, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, अशोक चव्हाण योग्यच बोलले. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जनतेचे प्रश्न उचलतो तेव्हा केंद्र आणि राज्य सरकार (Maharashtra Government) आमच्या विरोधात आरोप लावते चौकश्या करते. आमच्या मतदारसंघातील कामांवर बंदी आणली जाते. महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यावरची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यांचे मी समर्थन करतो.

होळीचा सण आहे. राग, लोभ, द्वेश, मत्सर आज होळीत जाळून टाकले पाहिजे. सर्वांनी भाऊबंदकीने नांदले पाहिजे. सत्तेमध्ये बसलेले द्वेशाचं राजकारण करत आहेत. होळी माता त्यांनाही सद्बुद्धी देईल, अशी प्रार्थना करतो, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT