Congress in Amravati. Sarkarnama
विदर्भ

LokSabha Election 2024 : नाना पटोलेंचाही दुजोरा, अमरावतीची जागा काँग्रेसकडेच राहणार!

Nana Patole : राज्यात मेरिटच्या आधारावर होणार जागांचे वाटप

Amar Ghatare

Amravati Constituency : लोकसभा निवडणुकी काँग्रेसची व्यूहरचना ठरवण्यासाठी गुरुवारी (ता. 18) अमरावती शहरात पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अमरावतीमध्ये दाखल झाले.

अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित झाले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असल्याचा दुजोरा दिला.

काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी अमरावतीच्या जागेवर काँग्रेस दावा करणार असल्याचे सूतोवाच केले. त्याच वक्तव्याची आमदार पटोले यांनी पुष्टी केली. ते म्हणाले, काँग्रेसची स्थिती अमरावती लोकसभा मतदारसंघात चांगलीच मजबूत आहे. त्यामुळे काँग्रेस अमरावतीची जागा आपल्याला मिळावी, यासाठी आग्रही भूमिका मांडणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश प्राप्त होईल, असे पटोले म्हणाले.

राज्यात 40 जागा महाविकास आघाडीला मिळतील. सर्वेक्षणातून तशी बाब पुढे आली आहे. या सर्वेक्षणामुळे आता भाजप घाबरली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत, असा दावा पटोले यांनी केला. देशात आणि महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे भाजप आता धार्मिक कार्डाचा वापर करीत आहे. येत्या 15 दिवसांत संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होईल. त्यानंतर भाजपला आणखी चिंता निर्माण होईल, असेही पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावतीमध्येही काँग्रेसची स्थिती उत्तम नव्हे, तर मजबूत आहे. त्यामुळेच काँग्रेसने अमरावतीच्या जागेसाठी आपली दावेदारी दाखल केली आहे. राज्यात मेरिटच्या आधारावर जागावाटपाचा ‘फार्म्युला’ ठरणार आहे. जिथे ज्या पक्षाला जास्त जागा मिळू शकतात, तिथे त्या पक्षाला उमेदवारी देण्याबाबतचा विचार केला जाणार आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या या फार्म्युल्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्रीयस्तरावर काँग्रेस बळकट होईल, असा ठाम विश्वास आमदार नाना पटोले यांनी मेळाव्यापूर्वी बोलताना व्यक्त केला. नागपूर येथे काँग्रेसच्या स्थापनादिन सोहळ्यानंतर राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचा फायदाही काँग्रेसला निश्चितच होणार असल्याचे ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT