Akola : शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते, पण नार्वेकर यांची भूमिका पाहता हा निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील दहाव्या शेड्युलला डावलल्याचे दिसत आहे, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी अकोला येथे केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनाही यावेळी डावलल्याचे स्पष्ट दिसते. राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट वाटत आहे. हा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आहे, असा घणाघाती हल्लाही पटोले यांनी केला.
विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर अकोला येथील टिळक भवन येथे प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमदार अपात्रतेचे प्रकरण कोर्टात 9 महिने चालले व मे 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्यास आणखी 7 महिने लावले. निकाल देताना नार्वेकर यांनी शिवसनेची 1999 मधील घटना मान्य केली. या घटनेनुसार ठाकरे यांचीच शिवसेना आहे, हे स्पष्ट होत असताना 2018 मधील शिवसेनेची घटना मान्य नाही असे नमूद केले.
शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे असा अनाकलनीय निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. शिवसेना पक्षफुटी आधी उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख होते. सुप्रीम कोर्टानेही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेच सुनिल प्रभू हे प्रतोद आहेत, असे स्पष्ट केले. असे असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र सुनिल प्रभू यांचे पक्षप्रतोद पद अमान्य करत एकनाथ शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडून आलेले आमदार-खासदार हा मूळ पक्ष नसतो पण आमदारांच्या बहुतमताचा आधार घेत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे असा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटातील एकाही आमदाराला अपात्र केले नाही हे विशेष. हा निकाल पक्षपाती वाटतो. हा निकाल देण्यासाठी वेळकाढूपणा केला गेला. सुप्रीम कोर्टाने दोन-तीनदा फटकारल्यानंतर या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसते, असे पटोले म्हणाले.
काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल. सुप्रीम कोर्ट योग्य निकाल देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीने देशात जे चालवले आहे, ते लोकशाहीसाठी घातक आहे. महाराष्ट्राप्रमाणे देशात हे असेच चालू राहिले, तर राजकीय पक्षांचे अस्तित्वच राहणार नाही. भाजपाला तेच हवे आहे. देशात विरोधी पक्ष राहुच नये यासाठी यासाठी भाजपाचा कुटील राजकारण सुरू आहे म्हणूनच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचा लढा आहे. लोकशाही व संविधान अबाधित राहिले पाहिजे ही काँग्रसेची भूमिका आहे, असे ते म्हणाले
शिवसेना फूट प्रकरणातील निकालाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट महाविकास आघाडी अधिक मजूबत होईल. भारतीय जनता पार्टीचा डाव उघड झाला आहे. जनताच भाजपाचा धडा शिकवेल, असे ते म्हणाले. निकाल देणारे न्यायाधीश राहुल नार्वेकर हे ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना भेटत असतील तर ते गंभीर आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होता. त्यामुळे काही संगनमत झाले का? अशी शंका येते, असेही पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.