MLA Narendra Bhondekar Sarkarnama
विदर्भ

Narendra Bhondekar : मला मंत्री का केले नाही? एकनाथ शिंदेंसमोरच चढला होता आमदार भोंडेकरांचा पारा...

Narendra Bhondekar’s Outburst : आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी थेट काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत युती केली होती.

Rajesh Charpe

Shiv Sena Politics : भंडारा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर कुठलीही भीडभाड न बाळगता थेट बोलून मोकळे होतात. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या यादीत नाव नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भंडारा दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी थेट काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत युती केली होती. यावरून त्यांना महायुतीच्या नेत्यांनी चांगलेच टार्गेट केले होते.

पूर्व विदर्भाचे समन्वयक म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी मोर्चा उघडला होता. हे सर्व वादविवाद सुरू असतानाच भोंडेकर यांनी मला मंत्री का केले नाही, अशी थेट विचारणा पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. यावर शिंदे यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी या निमित्ताने भोंडेकर यांची खदखद पुन्हा बाहेर आली.

आता त्यांना शिंदे कसे आवरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सेनेच्यावतीने भंडारा येथे आभार सभा घेण्यात आली. या सभेचे आयोजक भोंडेकर होते. उपमुख्यमंत्री शिंदे या सभेला प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या समोरच भोंडेकर म्हणाले, मी तीन वेळा निवडून आलो. तुम्हाला साथ दिली. असे सांगून त्यांनी मला मंत्रिमंडळात का स्थान दिले नाही, अशी विचारणा करून खंत व्यक्त केली.

भाजपचे आमदार परिणय फुये यांचे नाव न घेता त्यांचाही आपल्या भाषणातून भोंडेकर यांनी समाचार घेतला. जे अंगावर येथील त्यांना शिंगावर घेऊ, शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. भोंडेकर यांनी दूध संघाच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्याशी युती केल्यामुळे फुके यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. भोंडेकरांना कोणामुळे निवडून आले याचा विसर पडला आहे. युतीधर्मही ते विसरले असा आरोप त्यांच्यावर फुके यांनी केला होता.

भोंडेकर यांनीसुद्धा फुकेंना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मला कोणी मदत केली, कोणी किती सभा घेतल्या, याची सर्व माहिती मला आहे. मी स्वबळावरच निवडून आलो. तुम्ही मदत केली असती तर यापेक्षा जास्त मताने निवडून आलो असतो, असेही ते म्हणाले होते. दरम्यनच्या काळात पूर्व विदर्भातील काही नियुक्तांवरही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केला होता. पक्षाचे नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तातडीने बैठक बोलावली होती. त्यानंतर पूर्व विदर्भाची सर्वाधिकारी राज्यमंत्री यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यावरही भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेना भंडारा जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष झाला आहे. पक्ष मोठा होत असल्याने दुसऱ्या पक्षातील विरोधक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकत्याच झालेल्या नियुक्तीबाबत शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनीही सहमती दर्शविली असल्याचा दावा त्यांनी केला. आहे. विरोधी पक्षाचे नेते आमच्यावर टीकाटिपणी करतात ते समजू शकतो. परंतु आमचे लोक आरोप करीत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार भोंडेकरांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT