Pm Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदींना चौथ्यांदा कौल देणार का ‘कॉटन सिटी’

प्रसन्न जकाते

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम विदर्भातील आणखी एक ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये मोदी पुन्हा एकदा मतांचा जोगवा मागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार आहेत. शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या भारी गावाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 45 एकरच्या विस्तीर्ण जागेवर ही सभा घेतली जाणार आहे. भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत. या वेळी मोदी महाराष्ट्रातील महिलांसाठी एखाद्या मोठ्या योजनेची घोषणा करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काही केंद्रीय मंत्री दौऱ्याच्या आदल्या दिवशीच 27 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खासदार भावना गवळी आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी हे चवथ्यांदा यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री 2004 मध्ये नरेंद्र मोदी यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. त्यानंतर पंतप्रधान पदाचे दावेदार असताना 20 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे आले होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’च्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमानंतर मोदींना देशभरातून व्यापक मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठीदेखील ते आले होते. अशात आता मोदी चवथ्यांदा यवतमाळ जिल्ह्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यातही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक, मुंबई आणि सोलापूर येथे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मुंबईमध्ये अटल सेतूचे लोकार्पण त्यांनी केले. त्यानंतर 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. नाशिक येथे आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही ते उपस्थित राहिले. सोलापूरच्या दौऱ्यावर मोदींच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले होते. आता यवतमाळ दौऱ्यात मोदी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT