Mp Navnit Rana
Mp Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

Navnit Rana : पोलिस ठाण्यातील राडा नवनीत राणांना पडतोय महागात, भीम आर्मीचा मोर्चा...

सरकारनामा ब्यूरो

अमर घटारे

अमरावती : दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी लव जिहादच्या प्रकरणावरून आपला कॉल रेकॉर्ड का केला, यावरून राजापेठ पोलीस (Police) ठाण्यात चांगलाच राडा केला होता. आता हे प्रकरण नवनीत राणा यांना चांगलाच महागात पडणार, असे दिसत आहे.

नवनीत राणा (MP Navnit Rana) यांच्या विरोधात आज भीम आर्मी संघटनेच्यावतीने अमरावती (Amravati) शहरातील डॉ. आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत (Collector Office) मोर्चा काढण्यात आलेला आहे. नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आपण लोकशाहीमध्ये राहतो, पण काही लोकांना लोकशाही माहिती नाही आणि संविधान पण माहिती नाही. परवा खासदार नवनीत राणांनी जो काही धिंगाणा घातला, तो सर्वांनी बघितलाच आहे. नेहमी नेहमी पोलिसांबद्दल अपशब्द वापरणे, गरळ ओकणे. मात्र स्वरक्षणासाठी मात्र पोलिसांनाच सोबत घेऊन फिरणे. असे त्यांचे काम आहे. पोलिस घरी ठेऊन त्यांनी या परिस्थितीत फिरून दाखवावे. मग त्यांना कळेल पोलिसांचे महत्व काय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश भीम आर्मीचे अध्यक्ष सीताराम गंगावणे म्हणाले.

परवा परवा पोलिसांसोबत त्यांनी जी वागणूक केली, त्यासाठी त्यांच्या विरोधात कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलिस कर्मचाऱ्याची खासगी वस्तू हिसकावून घेणे, हा दरोड्याचा गुन्हा आहे. दलित शब्द वापरून त्यांनी आम्हा बहुजनांचा अपमान केला आहे. तो शब्द वापरता येत नाही. त्यामुळे कलम ३४१ नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला. लव जिहाद म्हणून त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण केली. त्याविरोधातही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. पोलिसांच्या समर्थनार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला असल्याचेही सीताराम गंगावणे यांनी सांगितले.

खासदार नवनीत राणा यांनी दलित हा शब्द पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी वापरत होत्या. दलित हा शब्द वापरू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्या आदेशाची प्रतही आमच्याकडे आहे. कोणत्याही वस्तीला दलित वस्ती असे संबोधू नये, असेही त्या आदेशात म्हटलेले आहे. खासदार राणा शिकलेल्या आहेत. न्यायालयाचा हा आदेश त्यांना माहिती असावा. मिडीयामधूनही याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे दलित शब्द वापरल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. मुस्लिम समाजाचा त्या द्वेष करतात. गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक प्रत्येकच समाजात आहेत. मग त्या सर्व समाजधर्मांशी वैर घेणार आहेत का? या अर्थी विचार केला तर खासदार राणा यांचे कार्यकर्ते, आमदार रवी राणा आणि त्या स्वतःसुद्धा गुन्हेगार आहेत. जोपर्यंत खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेरमोरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT