Navneet Rana | Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : नवनीत राणा यांनी उमेदवारीसाठी पतीचा पक्ष सोडला, पत्र व्हायरल !

Amravati Lok Sabha Constituency : काल रात्री उशिरा नवनीत राणा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि अमरावती लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्या.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Polls 2024 : राजकारणात केव्हा काय सोंग घ्यावं लागेल, हे काही सांगता येत नाही. पक्ष सोडणे, नव्या पक्षात जाणे हा तर एक पोरखेळच झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत तर पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा दूर दूरपर्यंत बघायला मिळत नाही.

राजकारणासाठी पती-पत्नी वेगवेगळे झाल्याचीही काही उदाहरणे बघायला मिळतात. असेच काहीसे एक उदाहरण अमरावतीमध्ये बघायला मिळाले. येथे पती-पत्नी वेगवेगळे नाही झाले. पण पतीचा पक्ष पत्नीने लोकसभेच्या उमेदवारीसाठी सोडला.

गेले पाच वर्षे भारतीय जनता पक्षासोबत राहिलेले अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले, पण मानेल तो भाजप पक्ष कसला.

रामटेकमध्ये तर भाजपने काँग्रेसच्या आमदाराला शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर लढायला लावले. कारण भाजपने ‘चारसौ पार’चे लक्ष्य ठेवलेले आहे. लोकसभेची एक-एक जागा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राणा दाम्पत्यालाही भाजपने सांगितले होते की, पाठिंबा नाही, हवं तर भाजपच्या तिकिटावर लढा आणि त्यासाठी राणा दाम्पत्य तयार झाले. काल रात्री उशिरा नवनीत राणा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भाजपमध्ये (BJP) प्रवेश घेतला आणि अमरावती लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्या, पण त्यासाठी त्यांना त्यांचा ‘राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी’ हा पक्ष सोडणे गरजेचे होते. या पक्षाचे संस्थापक त्यांचे पती रवी राणा आहेत आणि नवनीत राणा राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष होत्या.

खासदारकी मिळवण्यासाठी नवनीत यांनी पतीचा ‘युवा स्वाभिमान’ सोडला आणि भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या. हे म्हणजे ‘पदासाठी काहीही...’, असं झालंय. काल (ता. 27) नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानच्या पदाचा राजीनामा संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांना सुपूर्त केला. त्यानंतर रात्री त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज नवनीत राणा यांचे राजीनामा पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

काय म्हटलंय राजीनामा पत्रात ?

मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती. दिनांक २७ मार्च २०२४ रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.

पार्टीने आजपर्यंत मला जो मानसन्मान दिला सहकार्य केले. त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे (Yuva Swabhiman Party) आभार मानते. कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे, ही विनंती.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT