Delhi Political News : महाराष्ट्रात सध्या विदर्भातील अमरावती जिल्हा चर्चेत आहेत. येथे सुरू असलेल्या नेत्यांच्या सुंदोपसुंदीमुळे सध्या अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू, आमदार यशोमती ठाकूर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ, उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरू आहे. (It is not easy to get an independent MP elected from Amravati district)
अडसूळ पितापुत्रांशी असलेला राणा यांचा वाद तर न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. अशात खासदार नवनीत राणा यांनी मोठे विधान केले आहे. सुमारे साडेचार वर्षांपासून आपण अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करीत आहोत. त्याचे फलित म्हणजे मिळाले ते खासदार पद. आपण खासदार होऊन कधी संसदेच्या बाकांपर्यंत पोहोचू, असा विचारही केला नव्हता, असे खासदार राणा यांनी स्पष्ट केले. दिल्ली येथे आज (ता. १८) खासदार राणांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमरावती जिल्ह्यातून अपक्ष खासदार निवडून येणे सोपे नाही. खासदार या नात्याने आपल्याला लोकांच्या सेवेची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो, असे त्या म्हणाल्या. साडेचार वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक चांगले वाईट प्रसंग पुढे आलेत. त्यांना हिमतीने तोंड दिल्याचे राणा म्हणाल्या. ‘मी एका सैनिकाच्या परिवारातील आहे. राष्ट्रभक्ती माझ्या रक्तात आहे. राष्ट्राप्रति काही तरी देण्याच्या भावनेचे बाळकडू मला मिळाले आहे’, असे नवनीत राणा म्हणाल्या.
राष्ट्रवादाची शिकवण आपल्याला घरातून मिळाली आहे. मध्यमवर्गीय परिवारातील असल्याने आयुष्याने बरेच काही शिकविले. त्याचा उपयोग आता राजकीय जीवनात होत आहे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे विरोध तर होणारच. अशा परिस्थितीला कसे हाताळायचे हे पूर्णपणे ठाऊक असल्याचेही त्या म्हणाल्या.
जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीत संसदेचे कामकाज स्थलांतरित झाले आहे. या विषयावर बोलताना राणा म्हणाल्या की, अमरावतीची खासदार म्हणून संसद भवनात काम करतानाच्या अनेक स्मृती आहेत. त्या कधीही विसरू शकत नाही. भारताचे न भूतो, न भविष्यति असे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आयुष्यातील सुवर्णयोग आहे, असेही त्या म्हणाल्या. खासदार म्हणून ज्यावेळी संसद भवनात पाय ठेवला, त्यावेळी बरीच उत्सुकता होती. अनुभव नव्हता. परंतु अनेकांनी साथ दिली आणि लोकसभेत अमरावतीच्या जनतेसाठी आवाज बुलंद करता आला, असे खासदार नवनीत राणा यांनी नमूद केले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.