Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

नवाब मलिक आज गौप्यस्फोट करणार होते, म्हणून भाजपने ईडीला समोर केले...

जयेश गावंडे

अकोला : भाजपच्या लोकांना काही काम धंदा उरला नाही. शासकीय यंत्रणांचा सर्रासपणे गैरवापर केला जात आहे. हिजाब प्रकरणावर नवाब मलिक (Nawab Malik) बोलायला लागले म्हणून ईडीला पुढे केलं गेलं आहे. सर्व मराठा नेते भाजपने संपविले एकनाथ खडसे, (Eknath Khadse) नारायण राणे, (Narayan Rane) अनिल देशमुख Anil Deshmukh) यांसारखे नेते झाले. ओबीसी (OBC) नेत्यानंतर आता मुस्लीम नेत्यांनाही टार्गेट केलं जातं असल्याचा घणाघाती आरोप आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला.

ईडीमार्फत भ्रष्टाचाराची, मनी लॉंड्रींग प्रकरणांची चौकशी करायचीच असेल तर ऋषी अग्रवाल, विजय माल्या, निरव मोदी यांची चौकशी का केली जात नाही. हे काय भाजपचे जावई आहेत का? यांना परदेशात पाठवणारे भाजपचेच लोक आहेत. विमानतळांवरून या लोकांना पळवण्यात आले आणि विमानतळं कुणाच्या ताब्यात आहेत, तर भाजपच्या ताब्यात आहेत. हे जनतेच्या लक्षात येत नाही का? सर्व लक्षात येत आहे. लोक आता चिडलेले आहेत. सत्ता आहे तोपर्यंत ते हेच धंदे करतील, करू द्या. पण आता लोक यांना सोडणार नाहीत, असे आमदार मिटकरी म्हणाले.

भाजपने सर्व मोठे नेते संपविले. मराठा नेते यांना चालतच नाहीत. नारायण राणेंना भाजपनेच संपविले. आज त्यांच्याच बंगल्यांवर कारवाई केली जात आहे. २०१७ ची नोटीसला आता उत्तर येत आहे. २०१७ ला भाजपचं सरकार होतं. अनिल देशमुखांसारख्या मोठ्या नेत्यांना यांनी चुकीच्या आरोपांखाली अटक केली. त्यातून काहीही सिद्ध झालं नाही. एकनाथ खडसेंसारख्या मोठ्या नेत्याला भाजपने कसे संपविले, हे राज्यातील जनतेने पाहिलेच आहे. ओबीसी नेते संपवायला यांनी सुरुवात केली आहे.

मुस्लीम नेते नवाब मलिक यांनी हिजाबवर बोलायला सुरुवात केली तर आता त्यांच्याही मागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये जे लोक तोंडसुख घेत सुटले आहेत, त्या भाजपच्या लोकांचे आमच्याकडे असे काही पुरावे आहेत की, ज्यामुळे भाजपच्या लोकांचे बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्रींशी यांचे कसेकसे संबंध आहेत, हे सिद्ध होईल. त्यांची सगळी अंडीपिल्ली आमच्याकडे आहे, हे नवाब मलिकांनी जसे पत्रकार परिषदेत काल सांगितले आणि आज त्याबाबत गौप्यस्फोट होणार होता. त्यापूर्वीच सकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. चौकशी करण्यापूर्वी नोटीस द्यावी लागले, याचेही भान हे कारस्थान करणाऱ्यांना राहिले नाही, असे आमदार मिटकरी म्हणाले.

सुडबुद्धीने राजकारण करायचे, यापलिकडे आता ईडीला धंदा उरलेला नाही. त्यांना जे करायचे ते करू द्या. आम्ही पळपुटे नाही. याच मातीत जन्मलो, याच मातीत राहतो अन् याच मातीत मरणार. जे तीन लोक भाजपने देशाबाहेर पळवले, ते कुठे आहेत, हे त्यांनी सांगावे. गुजरातमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले, त्याबद्दल भाजपवाले काही बोलणार आहेत की नाही. गुजरातमधील बॅकेचा घोटाळा, लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारले, हातरज प्रकरण यांवर हे लोक बोलणार आहेत की नाही, असा प्रश्‍न आमदार मिटकरी यांनी केला. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेच आहे की, भाजपमध्ये आल्यामुळे मला आता ईडीची भीती नाही. हे त्यांचे वक्तव्य बोलके असल्याचेही आमदार मिटकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT