Sunil Tatkare at Gondia Sarkarnama
विदर्भ

Gram Panchayat Election : अजितदादांच्या शिलेदारानं मानले महाराष्ट्राचे आभार

अभिजीत घोरमारे

NCP News from Gondia : राज्यातील जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवलाय. दादांच्या नेतृत्वात राज्यातील बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. अनेक गावांत पक्षाचा झेंडा फडकलाय. त्यामुळं महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

उपराजधानी नागपूर येथील दौरा आटोपल्यानंतर तटकरे यांनी सोमवारी (ता. ६) गोंदिया जिल्ह्याला भेट दिली. तटकरे यांचा विदर्भ दौरा सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत होते. या निकालांबद्दल तटकरे यांनी आनंद व्यक्त केला. (NCP Ajit Pawar's group State President Sunil Tatkare expressed his gratitude to the people of Maharashtra from Gondia)

ग्रामपंचायत निवडणुकीमुळं कुणाला धक्का बसला वगैरे या बाबींवर बोलण्यापेक्षा लोकांचा अजितदादांवर विश्वास दिसलाय, असं तटकरे म्हणाले. बारामती इथल्या बाराच्या बाराही जागा अजित पवार गटानं काबीज केल्यात. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, हा अजित पवारांनी शरद पवार यांना मात देण्याच्या प्रकारापेक्षाही मोठी घटना आहे. बारामतीकरांनी अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय. आम्ही अजित पवार यांच्यासोबत आहोत हे दाखवण्यासाठी बारामतीकरांनी हा कौल दिलाय, असं त्यांनी नमूद केलं.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जो कौल मतदारांनी दिलाय त्यातून ज्यानं त्यानं घ्यायचा तो योग्य संदेश घ्यावा. उगाच कुणावरही टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही ज्या अतितदादांसोबत गेलोय, त्यांच्या पाठीशी लोक खंबीरपणं उभे राहताहेत हा मतदारांनी दिलेला संदेश जास्त महत्त्वाचा आहे, असं तटकरे यांनी नमूद केलं. आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय चित्र आणखी बदललेलं बघायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्याही निवडणुकीतून प्रत्येक पक्षाचे नेते, कार्यकर्ते एक संदेश घेत असतात. कोणत्या भागात आपण मजबूत आहोत, कुठं कमकुवत आहोत याची माहिती मिळत असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही संपूर्ण राज्यातील निवडणुकीचा अभ्यास करेल व आवश्यक तेथे आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करेल, असे तटकरे म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र गतिमान करण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलीय. थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या राज्यभर फिरतोय. त्यातून पक्षाला फायदा होईल. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत काही वैचारिक मतभेद असले तरी आम्ही जुळवून घेतलं. विकासाचं राजकारण करायचं असेल, तर राजकीय मतभेद विसरावे लागतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या ४८ विधानसभा सदस्य अजितदादा यांच्यासोबत आहेत. नागालँडचे सात, झारखंडमधून एक सदस्य सोबत असल्याचा दावा तटकरे यांनी केला.

आरक्षणाचा तिढा सुटेल

मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी समाजानं मध्यंतरी आक्रमक पद्धतीनं मध्यंतरी आंदोलन केलं. सरकार या सर्व विषयांवर गंभीर आहे. मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल. इतर समाजांवरही अन्याय होणार नाही, असा निर्णय राज्य सरकार घेईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT