Chandrakant Patil and Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

NCP Leader on Chandrakant Patil : ‘घड्याळात’ योग्य वेळ पाहून नागपूरच्या नेत्याने भरली चंद्रकांतदादांना 'चावी' !

Anil Deshmukh : भाजपच्या कमळाला आपल्या घड्याळाचे काटे टोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

Atul Mehere

Nagpur Political News : भारतीय जनता पार्टीतील वजनदार नेता म्हणून ओळख असलेले मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने ‘घड्याळातील’ योग्य वेळ पाहून चावी भरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वीच ११ जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या नावांमध्ये बदल केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या या नेत्याने दादांना डिवचले आहे. (He tried his best to pierce the lotus of BJP)

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासह आतापर्यंत आठ मोठ्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळण्याचा दांडगा अनुभव चंद्रकांतदादा पाटील यांना आहे. भाजपमधील प्रचंड अनुभवी, दांडगा जनसंपर्क आणि अगदी वरच्या पदापर्यंत जाण्याची क्षमताही दादांमध्ये आहे. तरीही अन्याय होत असल्याचे नमूद करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दादांना चावी भरलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार, एकनाथ शिंदे व भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेत. वेळेनुसार गरज पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खुर्चीतील अर्धी जागा अजित दादांसोबत ‘शेअर’ केली. अजितदादा सत्तेमध्ये सहभागी होईपर्यंत जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदांच्या जबाबदारीचे वाटप झालेले होते. पालकमंत्री म्हणजे एकप्रकारे जिल्ह्याचं ‘मिनी सीएम’च.

पुण्यावर आपलेच राज्य असावे व तेथील मुख्य शासकीय सोहळ्यांमध्ये आपल्याच हातून तिरंगा फडकवला जावा, अशी अजितदादांची इच्छा होती. परंतु सरकारने शासकीय ध्वजारोहणाची यादी जाहीर केल्यानंतर त्यातून पवारांचे नाव पुण्याच्या नावासमोरून गायब होते. या मुद्द्यावरून राजी-नाराजी नाट्य रंगले. परिणामी राज्य सरकारला ध्वजारोहणासंदर्भात दुसरी यादी जाहीर करावी लागली.

अजितदादांचे पुणे प्रेम जगापासून लपलेले नाही. पुण्यासाठी दादा काहीही करू शकतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पुण्यावर आपलेच राज्य असावे, यासाठी पवारांची शिंदे, फडणवीसांवर गेल्या अनेक दिवसांपासून ‘दादा’गिरी सुरू होती. त्यांचा हा ‘पॉवर गेम’ अखेर यशस्वी झाला आणि पालकमंत्रिपदाच्या ‘पुणेरी पाटी’वर अजितदादांचे नाव आले. मात्र, या दादांसाठी भाजपला आपल्या दादांचा ‘गेम’ करावा लागल्याचे नमूद करीत माजी गृहमंत्र्यांनी हीच ती योग्य वेळ असल्याचे हेरत पाटील यांना डिवचले.

दादा आणखी किती दिवस हा अन्याय सहन करणार, असा प्रश्न विचारणारे ट्विट (X) देशमुखांनी गुरुवारी (ता. ५) पोस्ट केले. चंद्रकांतदादांची खाती आधी काढण्यात आली आणि आता पालकमंत्रिपदही, हे डिमोशन बघवत नसल्याच्या भावना व्यक्त करीत देशमुखांनी भाजपच्या कमळाला आपल्या घड्याळाचे काटे टोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. देशमुखांच्या या प्रतिक्रियेवर आता चंद्रकांतदादा कसे ‘रिअॅक्ट’ होतात हे लवकरच कळेल.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT