MLA Anil Deshmukh on Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे गेल्या १० ते १२ दिवसांपासून होते तसेच आहे. अजित पवार दिल्लीला जाऊन आले त्यानंतर लगेच विस्तार होईल, असे वाटत होते. पण झाला नाही. आता दिल्लीतून यादी निघाली आहे आणि ती जाहीर झाल्याशिवाय काही खरं नाही, असे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले. (List is reported and it will be announced soon)
आज (ता. १४) सकाळी आमदार अनिल देशमुख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, यादी निघाल्याची माहिती जरी असली, तरी खरं काय ते खाते जाहीर झाल्यावरच कळेल. अजित पवार आणि शरद पवार लवकरच एकत्र येणार आहेत, अशी माहिती दादा गटातील एका आमदाराने दिली, याबाबत विचारले असता, शरद पवारांना सोडून गेलेल्या कुणाला जर वाटलं की, आपण चूक केली, तर ते परत येऊ शकतात, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही. कारण पूर्वीही त्यांनी सांगितलं होतं की, ‘राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती नाही म्हणजे नाही… नाही.. नाही.. नाही...’ पण मग पुढे काय झालं. आता त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेतले आहे. राजकारणात परिस्थिती बदलली की, भूमिका बदलावी लागते. पण सरडा रंग बदलतो तशी ती नसावी, असे आमदार देशमुख म्हणाले.
२०२४च्या निवडणुकीत कोण जास्त प्रभावी ठरेल? अजित पवार की शरद पवार, असे विचारले असता, भारतात २८ राज्यांचे अध्यक्ष आहेत. त्यांपैकी २४ राज्यांचे अध्यक्ष दिल्लीतील शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचेच पारडे जड आहे. १९७८ मध्ये शरद पवारांकडे फक्त पाच आमदार राहिले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या पाच आमदारांना सोबत घेऊन पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि ५८ आमदार निवडून आणले, अशी माहिती देशमुखांनी दिली.
२०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते पक्ष सोडून गेले होते. तेव्हासुद्धा शरद पवारांनी एकट्यानेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतरचे निकाल जनतेने बघितले. केवळ ५३ आमदारच निवडून नाही आणले, तर महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही काबीज केली. त्यामुळे आगामी निवडणुकीतही शरद पवारांचाच बोलबाला असेल, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.
ज्या पक्षाकडे सदस्यसंख्या जास्त असेल, त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांचे नेते विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतील. निवडणूक आल्यावर प्रत्येक पक्ष आपले उमेदवार उभे करतील, याचा काही फरक पडणार नाही शरद पवार जेव्हा दौऱ्यावर बाहेर पडतील त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळेल. गोंदिया, भंडारा मधील अनेक पदाधिकारी शरद पवारांना भेटायला गेले होते, असेही त्यांनी सांगितले.
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल’, या नाना पटोलेंच्या (Nana Patole) विधानावर राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर सर्व विरोधी पक्षांना राज्यात राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी करावी लागेल. कारण राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, एका मंत्र्याकडे पाच-पाच सहा-सहा जिल्ह्यांचा कारभार आहे. त्यामुळे असे झाल्यास नवल वाटायला नको, असे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.