Nitesh Karale  Sarkarnama
विदर्भ

Nitesh Karale MLA Offer: ‘या’ पक्षांकडून आली ऑफर, कराळे गुरुजींना लागले आमदारकीचे वेध!

सरकारनामा ब्यूरो

Vidarbha Politics: भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून ऑफर आलेली आहे. पण मी नेत्यांना सांगितले की, मी थेट बोलतो. तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही. पण त्यांच्या चुकलेल्या धोरणांवर मी कडाडून प्रहार करतो. मग मला धमक्या येतात, तेव्हा तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे. किमान नैतिक आधार तरी दिला पाहिजे. पण तसे होत नाही, असे कराळे गुरुजी म्हणाले. (At least moral support should be given)

नितेश कराळे म्हणजेच कराळे गुरूजी त्यांच्या वऱ्हाडी भाषेतील शिकवण्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे आज अख्ख्या महाराष्‍ट्राला ठाऊक आहेत. राज्यातील राजकीय, शैक्षणिक घडामोडींवर ते नेहमीच व्यक्त होत असतात. सध्या ते पंढरपूरच्या वारीमध्ये गेलेले आहेत. तेथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गट किंवा शिवसेनेकडून ऑफर अद्याप आली नाही. आमच्या वर्धा, पुलगाव किंवा देवळी मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी आणि युतीमध्ये कोणत्या पक्षासाठी सुटते. हे बघून नंतर कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, याचा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. तीनपैकी कोणत्याही मतदारसंघातून आमदार व्हायला आवडेल, असेही कराळे गुरुजींनी सांगितले.

लोकसभेची निवडणूक लढवणार काय, याबद्दल विचारले असता, तेवढा आपला आवाका नाही, पैसा नाही. कारण सामान्य कुटुंबातून आणि शून्यातून येथपर्यंत आलो आहे. त्यामुळे पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्याचा मानस नितेश कराळे यांनी व्यक्त केला. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे.

माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. शेतकऱ्याचे (Farmers) हित जोपासले गेले पाहिजे. बेरोजगारी दूर झाली पाहिजे. आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रांत समान काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात २०२४मध्ये असला पाहिजे. उद्धव ठाकरे चांगले मुख्यमंत्री होते. पण कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरही आजारपणामुळे ते घराच्या बाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांचे आमदार सोडून गेले.

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) प्रकृतीमुळे त्यांच्याकडून हा व्याप सांभाळला जात नसेल, तर त्यांनी मुलांकडे किंवा एखाद्या युवा नेत्याकडे जबाबदारी दिली पाहिजे, असा सल्लाही कराळे गुरूजींनी उद्धव ठाकरे यांना दिला. राज्यातील (Maharashtra) परिस्थिती आज चांगली नाही. राजकारणाची पातळी घसरलेली आहे. जनतेने योग्य निवड करण्याची गरज आहे. तेव्हाच हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ शकतो, असेही कराळे गुरुजी म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT