Nagpur News : मुंबईसह संपर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा दबदबा होता. बाळासाहेबांच्या शब्दाच्या बाहेर जाण्याची त्यावेळी कोणाची हिंमत नव्हती. असा राज्यभर त्यांचा धाक असताना छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली. ते सात आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे तणावाची स्थिती होती. त्यावेळी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते. छगन भुजबळ व त्यांच्या सहकारी आमदार गायब झाले होते. भीतीने ते विधानसभेत येणारच नाही अशी शक्यता वर्तविली जात होती.
मात्र, अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच मागच्या दाराने भुजबळ आल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला अशी आठवण भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज काढली.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यास वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (ता.13) नितीन गडकरी यांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी बोलावले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी विधान परिषदेचे सदस्य होते. शिवसेना-भाजप युतीच्या काळात ते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते.
विधान परिषदेचे सदस्य असतानाच ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर ते केंद्रात गेले. सुमारे दोन दशकातील काही घडामोडी आणि आठवणी त्यांनी यावेळी विषद केल्या. यात शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ यांच्या एंट्रीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
शिवसेना-भाजपची युती असल्याने भुजबळांच्या एंट्रीला आमचा सत्ताधाऱ्यांसोबत मोठा वाद झाला होता. सभागृहात यावरून मोठा गदारोळसुद्धा झाला होता. मात्र आमची मैत्री सर्वांसोबत कायम राहिली. आपसात कटुता नव्हती. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसोबत बोलतात, मैत्रीचे नाते जपतात, एकमेकांच्या कार्यक्रमांना जातात याचे आजही इतर राज्यातील नेत्यांना आश्चर्य वाटते.
मी आणि शरद पवार एका कार्यक्रमात एकत्र होतो. याचे त्यावेळी 'नेते' दिवंगत मुलायमसिंह यादव यांनासुद्धा आश्चर्य वाटले होते. ते त्यांनी मला तसे बोलून दाखवले होते. महाराष्ट्रातील विरोधक एकमेकांसोबत बोलतात, कार्यक्रमाला जातात हे त्यांना पटतच नव्हते. मात्र ही महाराष्ट्राची परंपरा आहे.
सभागृहातील भांडणे, विरोध, मतभेद सभागृह व निवडणुकी पुरताच मर्यादित ठेवली जातात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, जयंतराव टिळक यांनी सुरुवातीपासूनच ही परंपरा पाळली. लोकशाही प्रगल्भ केली. ती आजवर चालत आहे. हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असल्याचेही गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. येथे गुणात्मक चर्चा व्हायच्या. नियमांचा किस पडायचा. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना असाच एक वाद सुरू होता. नियमांचा किस पाडला जात होता.
अधिवेशन संपल्यानंतरही हा विषय संपत नव्हता. सत्ताधारी आणि विरोधकांनी नियमांवर बोट ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा अधिवेशन सुरू करायला लावले होते याची आठवणही गडकरी यांनी काढली. जमशेटजी टाटा, यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतरची विधान परिषदेत झालेली भाषणे कोणीही विसरू शकत नाही इतकी सुंदर होती. यावेळी गडकरी यांनी विलासराव देशमुख, वसंतराव नाईक, प्रमोद नवलकर, रा.सू. गवई. ना.धो. महानोर यांचे संवाद कौशल्य, सुसंस्कृतपणा, भाषणांची आवर्जून आठवण काढली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.