Nana Patole, Nitin Raut and Atul Londhe
Nana Patole, Nitin Raut and Atul Londhe Sarkarnama
विदर्भ

नितीन राऊत पक्षाच्या बैठकीत न जाताच परतले; लोंढे म्हणतात, ते नाराज नाहीत…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) आज कॉंग्रेस पक्षाच्या (Congress Party) बैठकीसाठी गेले होते. पण अचानक काय झाले कुणास ठाऊक, बैठकीला न जाता ते बाहेरूनच परतले. डॉ. राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा लगेच सुरू झाली. पण तेवढ्यातच कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले डॉ. राऊत अजिबात नाराज नाहीत. त्यामुळे ‘काय चाललंय कॉंग्रेसमध्ये?’, ही चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबईतील वांद्रे येथे एमसीएमध्ये कॉंग्रेसची बैठक सुरू आहे. डॉ. नितीन राऊत बैठकीत सहभागी होण्यासाठी त्याठिकाणी पोहोचलेसुद्धा. तेथे गेटवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या त्यांची चर्चा झाली. काय चर्चा झाली, हे कळू शकले नाही. पण त्यानंतर बैठकीत सहभागी न होताच डॉ. राऊत परतले. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांचे एकमेकांसोबत पटत नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अतुल लोंढे म्हणाले, नितीन राऊतांचा कदाचित गैरसमज झाला असेल. पण त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले आणि त्यांच्या नाराजीचं काहीच कारण नाही. कॉंग्रेसच्या ठरावीक नेत्यांपुरतीच ही बैठक मर्यादित होती.

अतुल लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसच्या ठरावीक नेत्यांसाठीच जर ही बैठक होती आणि नितीन राऊत यांचा त्यात समावेश नव्हता, तर मग तेथे त्यांना का बोलावण्यात आले आणि जर बोलावलेही नसेल, तर मग ते तेथे का गेले अन् बैठकीत उपस्थित न होता बाहेरूनच का परतले, हे सर्व प्रश्‍न अनुत्तरित राहतात. त्यामुळे अतुल लोंढे यांनी केलेला खुलासा हा न पटण्यासारखा आहे, अशी चर्चा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. नेत्यांमध्ये पुन्हा एकमेकांना विरोध सुरू झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा संपूर्ण आढावा एच.के. पाटील घेणार आहेत. निधीबाबतची मागणी ज्येष्ठ नेत्यांसमोर ठेवली जाणार आहे. ही बैठकसुद्धा एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत असली तरी नितीन राऊत यांना पाहिजे असलेल्या निधीच्या प्रश्‍नाबाबत ही बैठक नव्हतीच. तर नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या आणि होणार असलेल्या निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली. निवडणुकांबाबत कॉंग्रेसचे धोरण स्पष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही कॉंग्रेस म्हणूनच लढणार आणि कॉंग्रेसला नंबर १ चा पक्ष बनवणार, असल्याचेही अतुल लोंढे म्हणाले.

नाना पटोलेही म्हणतात, राऊत नाराज नाहीत…

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसुद्धा (Nana Patole) आपल्या पक्षाची बाजू सावरण्यासाठी सरसावले. लोंढेंच्या पाठोपाठ नानांनीही नितीन राऊत नाराज नसल्याची प्रतिक्रिया दीली आहे. मुख्य प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्षांना लगेच माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे.

नितेश राणे यांना न्यायालयाने दणका दिला आहे. त्याबाबत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नितेश राणे निर्दोष असतील तर समोर यावे. कारण न्यायालयाने त्यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात काहीतरी तथ्थ्य आढळले असणार त्यामुळेच त्यांची मागणी अमान्य करण्यात आली. भाजपला वाद घडवून आणून आणि देशातील धार्मिक वातावरण खराब करून निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद उकरून काढले जात आहेत. तसे पाहिले तर राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करायला नको. तरीही भाजपकडून तो केला जात आहे. सरळ सरळ प्रक्रिया फॉलो करा आणि मगच नामकरण करा, असे मत अतुल लोंढे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT