Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
विदर्भ

कॉंग्रेसला सोडून विरोधकांची मोट बांधण्याचा विचार नाही : नवाब मलिक

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा मुंबई दौरा झाल्यानंतर भाजप सरकारच्या विरोधात मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये कॉंग्रेसचा (Congress) समावेश असेल की नाही, यावरही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना विचारले असता, कॉंग्रेसला सोडून विरोधकांची मोट बांधण्याचा कुठलाही विचार नाही, असे ते म्हणाले.

नवाब मलिक गोंदियाला जाण्यासाठी आले असता येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आधीपासूनच सांगत आले आहेत की, केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात देशभर सर्व राजकीय पक्षांची मोट बांधायची आहे. पण ही मोट बांधण्याचे काम कॉंग्रेससारख्या मोठ्या पक्षाशिवाय होऊ शकणार नाही. युपीआयच्या बाहेरचे जे पक्ष आहेत, त्यांच्या खासदारांची संख्या जवळपास १५० आहे. त्यामुळे अशा सर्व लोकांना सोबत घेणे गरजेचे आहे. सर्व राजकीय पक्षातील लोकांना एकजूट करण्याचे काम खूप आधीपासून सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे मोठे काम या देशात होणार आहे.

या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, हा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे, पण नेतृत्व कोण करेल, हा विषय सध्या मोठा नाही, तर भाजप सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नेतृत्व हे सामूहिक असायला पाहिजे, अशी चर्चा सुरू आहे. सर्वजण एकत्र आल्यानंतर पुढे कसे जायचे, त्यावर चर्चा होईल, असे नवाब मलिक म्हणाले. देशात कॉंग्रेसशिवाय विरोधी पक्षाची मोट बांधली जाऊ शकत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. त्यामुळे लवकरच ही मोट तयार होईल आणि आम्ही देशाला एक नवीन पर्याय देऊ, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सूत्र पक्के..

सन २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकांनंतर देशात परिवर्तन होईल, हे मात्र निश्‍चित. नवाब मलिक गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तेथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष आमने सामने उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस काय करणार, असे विचारले असता ते म्हणाले, स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन जी परिस्थिती असेल, त्या पद्धतीने निवडणुका लढविल्या जातील, हे महाविकास आघाडीमध्ये ठरलेले सूत्र पक्के आहे. त्यामुळे त्यांची चिंता नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे मलिक यांनी सांगितले.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकत्र लढण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे तेथे स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्या. त्यावेळीही कॉंग्रेसशिवाय मोठी आघाडी उभारता येणे शक्य नाही, अशीच चर्चा झाली आहे. पण युपीएच्या बाहेर १५० खासदार आहेत, जे युपीएचा भाग नाहीत. प्राधान्याने त्यांचाही विचार करावा लागणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT