Mukhyamantri Ladaki Bahin Yojna Sarkarnama
विदर्भ

Ladaki Bahin Yojna : भाजपला बहिणीऐवजी भाऊच अधिक लाडका

BJP Mukhyamantri Ladaki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी एकाही बहिणींची नियुक्ती केली नाही. नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदरसंघातील समित्यांच्या अध्यक्षपदी लाडक्या भाऊंची नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 06 Sept : महायुती सरकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडून (Ladaki Bahin Yojna) विधानसभेच्या निवडणुकीत मोठी अपेक्षा आहे. याकरिता या योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला जात आहे. यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत.

मात्र, लाडकी बहीण योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी एकाही बहिणींची नियुक्ती केली नाही. नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदरसंघातील समित्यांच्या अध्यक्षपदी लाडक्या भाऊंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या बहिणी चांगल्याच नाराज आहेत.

लाडक्या बहिणीला लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय तीन सदस्यीय प्रशासकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तीन सदस्यांपैकी एकाला समितीचा अध्यक्ष करण्यात आले आहे. लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेणे, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अर्ज भरलेल्या महिला लाभ मिळवून देण्याचे काम या समितीमार्फत केले जात आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक आणि कामठी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनाच समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहेत. हिंगणा मतदारसंघात आमदार समीर मेघे यांचे खास समजले जाणारे बबलू गौतम अध्यक्ष आहेत. उमरेडमध्ये माजी आमदार सुधीर पारवे, काटोलमध्ये भाजपचे महामंत्री दिनेश ठाकरे, सावनेरमध्ये मनोहर कुंभारे हे लाडकी बहीण योजनेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आहेत.

यापैकी एकाही समितीच्या अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती करण्यात आली नसल्याने महिला भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. भाजपमध्ये एकही महिला सक्षम नाही का असा सवालही उपस्थित केला जात आहे. लाडक्या बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत घटलेली टक्केवारी लाडकी बहीण भरून काढेल अशी अपेक्षा भाजपला (BJP) आहे.

याकरिता या योजनेचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करण्याचे भाजपने ठरवले आहे. रेशीमबाग मैदानावर मोठा कार्यक्रम घेतल्यानंतर आता मतदारसंघ निहाय लाडक्या बहिणीचे मेळावे घेण्यात येणार आहेत. याकरिता सर्व महिला पदाधिकाऱ्यांना भाजपने कामाला लावले आहे. मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत 33 टक्के महिला आरक्षणाचा मुद्याचा हाती घेतला आहे. विधानसभेच्या निवडणुकीपासूनच महिला आरक्षणाचा कायदा लागू करावा अशी मागणी केली जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा महिलांना 33 टक्के जागा दिल्या जाणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तशी विनंतीसुद्धा केली आहे.

महिलांच्या अर्जांना प्राधान्य द्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे. 33 टक्के महिला आरक्षणाचा विषय दिल्लीतूनच आला असल्याने स्थानिकांनाही महिलांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. असे असताना भाजपमध्ये समितीच्या अध्यक्षपदीसुद्धा नियुक्ती केली जात नसल्याने महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT