Nagpur News : मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात किती व कुठे दौरे करायचे तो त्यांचा प्रश्न आहे. आरक्षण मागणं हा त्यांचा हक्क आहे. परंतु यासाठी जरांगे यांनी ओबीसी समाजाला लक्ष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळं मराठा आणि ओबीसी समाजातील तेढ वाढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली.
नागपूर येथे डॉ. तायवाडे म्हणाले की, संवैधानिक मार्गानं मागण्या पूर्ण करून घेण्याचा मराठ्यांसह प्रत्येक समाजाला हक्क आहे. मात्र, त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करणं चुकीचं आहे. संविधानानं जे हक्क ओबीसी समाजाला दिले आहेत, त्यांचं रक्षण करण्याचं काम ओबीसी नेत्यांचं आहे. त्यामुळं नेते चुकीचं काही करताहेत असं वाटत नाही. (OBC Leader Babanrao Taywade from Nagpur asks Manoj Jarange Patil to Stop Discussing about OBC on Maratha Reservation)
मनोज जरांगे यांचं मुख्य काम आहे मराठा समाजासाठी आरक्षण मागणं. ते त्यांनी करावं. ओबीसी समाज त्याचं काम करेल. ओबीसी नेते समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य करीत नाहीत. उलट जरांगे यांनी गेल्या तीन दिवसांपासून ओबीसी नेत्यांवर टीका करणं सुरू केलंय. त्यामुळं ओबीसींमधील रोष वाढतोय. परिणामी दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं जरांगे यांनी ओबीसी समाजावर संतापजनक भाष्य करू नये, असं डॉ. तायवाडे म्हणाले.
ओबीसींनी आमचं आरक्षण खाल्लं, असं जरांगे पाटील म्हणत आहेत. आपला त्यांना प्रश्न आहे, की त्यांचं कोणतं आरक्षण ओबीसी समाजानं घेतलं हे त्यांनी सांगावं. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोजानं मराठा मागास आहे, असा अहवाल दिला पाहिजे. तसं झालेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी इतिहास आणि मुद्दे समजून घ्यावेत. त्यानंतरच ओबीसी नेत्यांवर टीका करावी. ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण हे संविधानानुसार आहे. त्यामुळं मनोज जरांगे यांनी चुकीची वक्तव्यं करू नयेत, असंही ते म्हणाले. ओबीसी नेते केवळ समाजाच्या हितासाठी आवाज उठवत आहेत. आमच्यापैकी कुणाचाच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विरोध नाही. त्यामुळं ओबीसी मराठ्यांच्या विरोधात आहे, असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. ओबीसी नेत्यांना धमकावण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. ५२ टक्के ओबीसी जागा झाला तर अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे प्रश्न त्यानंतर आला आहे. त्यासंदर्भात निर्णयही झाला आहे. ओबीसींची फाइल अनेक महिन्यांपासून पडून आहे. ‘सारथी’ला निधी देताना सढळ हातानं मदत देता येते. मात्र, ‘महाज्योती’ला निधी देताना, कर्मचारी देताना हात आखडता होतो, हे चुकीचं असल्याचं डॉ. तायवाडे म्हणाले. विधिमंडळ अधिवेशनात आठ डिसेंबर पूर्ण दिवस मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राखीव ठेवला आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी एक दिवस राखीव ठेवावं, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.