Movement of OBCs - Dr. Babanrao Taywade Sarkarnama
विदर्भ

OBC - Maratha Reservation : सरकारने दबावात निर्णय घेतला तर ओबीसी रस्त्यावर उतरणार…

Dr. Babanrao Taywade : रामदेवबाबांच्या निषेधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले कार्यकर्ते.

Atul Mehere

Nagpur - Chandrapur : मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे अजूनही तसेच पडले आहे. अंतरवालीतून मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकत असल्याचा समज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा झालेला आहे आणि जरांगे पाटलांच्या दबावात सरकारने जर निर्णय घेतला तर ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

दरम्यान बाबा रामदेव यांनी ओबीसी समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्यावरूनही ओबीसी समाज संतापला आहे. बाबा रामदेव यांचा निषेध करण्यासाठी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते धडकले. ओबीसी समाजाचा वारंवार होत असलेला अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ठणकावून सांगितले.

मागिल काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते स्वतः ला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेताना आणि ओबीसी समाजाची ‘ऐसी तैसी’ उच्चारुण ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या कृत्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामदेवबाबा यांच्या विरोधात आज निदर्शने तसे निषेध आंदोलन करण्यात आले.

बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी राजूरकर यांनी केली आहे, बाबाची दुकानदारी या देशातील ६५% ओबीसी समाजाच्या खरेदी-विक्री करून चालत आहे, याचे भान या भांडवलदारी बाबाने राखायला पाहिजे. समाजामध्ये जाणुनबुजून सामाजिक गतिरोध निर्माण करुन ओबीसी समाजाविषयी अपशब्द बोलणे टाळले पाहिजे. अन्यथा त्यांच्या दुकानासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. १५ दिवसांच्या आत त्यांनी माफी न मागितल्यास आंदोलन तीव्र करण्यात असाही इशारा राजूरकर यांनी दिला आहे.

आजच्या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, गणेश आवारी , डॉ. संजय घाटे, कर्मचारी संघटनेचे देवराव दिवसे, प्रदीप पावडे, रजनी मोरे, अजय बलकी, रोशन पचारे, गोविंदा उपरे, विलास भगत, रंगराव पवार, पवन अगदारी, नागेश बोडे, अतुल मोहितकर, नंदू टोंगे, सुरेश विधाते, रणजित पिंपलशेडे, तुळशीराम देरकर, संतोष बांदूरकर, दिनेश भोंगाडे, भास्कर सोनेकर लखन हिकरे आदी सहभागी झाले.

आरक्षणाबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, कुणबी नोंदी शोधण्यासाठी आधीच विशेष मोहीम सुरुच आहे. त्यामुळे आता वेगळ्या मोहीम काय घेणार? सर्व नोंदी तपासून झाल्या आहेत. ज्या ५७ लाख नोंदी सापडल्या त्यांपैकी यापूर्वी किती जणांनी ओबीसी प्रमाणपत्र आधी घेतलं, याचा आकडा सरकारने आधी जाहीर करावा. आजघडीला ते गरजेचे आहे. कारण जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. ते सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ज्या ५७ लाख नोंदी सापडल्याचे सांगण्यात येते, त्यांपैकी ९९.५ टक्के लोकांनी आधीच प्रमाणपत्र घेतलेले आहे. ते जन्मजात कुणबी आहेत, ओबीसी आहेत. ज्या नवीन नोंदी सापडल्या त्याला आमचा विरोध नाही. मंडल आयोगाबाबत बोलताना डॉ. तायवाडे म्हणाले, मंडल आयोग कोणाही रद्द करू शकत नाही. कारण देशाची लोकसभा आणि राज्यसभेनं मंडल आयोगाचं गठण केलं आहे. देशातील ओबीसींची संख्या मंडल आयोगाने जाहीर केली होती. कोणी काहीही म्हटलं तरी मंडल आयोग रद्द करू शकत नाही.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. आम्हीसुद्धा मुंबईतील आंदोलनावर ठाम आहे. सरकारने आम्हाला शब्द दिला आहे की, ओबीसी कोट्यातून कुणालाही आरक्षण देणार नाही. जर सरकारने जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन काही निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT