Narendra Modi, Nana Patole and Amit Shaha Sarkarnama
विदर्भ

परमबीरसिंह कुठे आहेत, हे मोदी आणि शहांनाच माहिती…

काय करायचं आहे, What to do हे कॉंग्रेसला Congress चांगलं कळतं. कारण कॉंग्रेस हा काही कालचा आलेला पक्ष नाही.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : परमबीरसिंह कुठे आहेत, हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाच माहिती आहे. कारण त्यांचे पलायन अहमदाबाद विमानतळावरून झालेले आहे. केंद्रीय तपास संस्थांच्या निदर्शनास तसे आले आहे. त्यांचे ‘लास्ट लोकेशन’ अहमदाबाद होते, असे तपास यंत्रणांनीच सांगितले आहे. म्हणून ज्या दोन लोकांची नावे मी आत्ता सांगितली, त्या दोघांनाच परमबीरसिंह यांच्याबद्दल अधिक माहिती आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

नागपुरात आले असताना विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. नाना पुढे म्हणाले, संजय राऊत पत्रकार आहेत. पत्रकारांना आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो, हे आमचा पक्ष समजतो. पण आमचा विरोधी पक्ष भाजपला हे कळत नाही. काय करायचं आहे, हे कॉंग्रेसला चांगलं कळतं. कारण कॉंग्रेस हा काही कालचा आलेला पक्ष नाही. आमच्या पक्षाला परंपरा आहे, इतिहास आहे. ज्या विचारांचं सरकार केंद्रामध्ये आहे, त्याच विचारांचा जयघोष होणार आहे, यात काही नावीन्य आहे, असे मला वाटत नाही आणि देशातले लोक हे सर्व ओळखतात. या सर्व घटनांचे मंथन करून आपले मत तयार करतात. आज देशभर पसरवण्यात येत असलेल्या गोडसेच्या उदो उदो ला लोकच संपुष्टात आणतील, यात तिळमात्रही शंका नाही, असे नाना पटोले म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे यांना वाटत असेल की अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे आणि शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे, तर त्यात काही गैर नाही. लोकशाही देशात असे वाटण गैर नाही. येथे जनता मोठी असते आणि जनतेच्या आशीर्वादने सर्व गोष्टी होत असतात. त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काही ठिकाणी युती होतही असेल, तर कॉंग्रेसला त्याकडे बघण्याची गरज नाही. कुणी कुणाशी युती करावी, हा त्या त्या पक्षांचा प्रश्‍न आहे. आम्हाला काय करायचे आहे, हा आमचा विचार आहे, असे पटोले म्हणाले.

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे अपेक्षितच आहे. ते आरोप करणार नाही, तर ते विरोधक कशाचे? वस्तुस्थिती अशी आहे की, केंद्र सरकारकडून महाराष्‍ट्रासोबत दुजाभाव चाललेला आहे. सातत्याने महाराष्ट्रावर संकट येत आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे केंद्राने राज्याला मदत करणे गरजेचे आहे. विरोधकांनी येथे दौऱ्याचे नाटकं करून मगरीचे आसू गाळण्यापेक्षा दिल्लीत जाऊन अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्यासाठी निधी आणावा आणि नुकसानग्रस्त लोकांना वाटावा, तर लोक त्यांना शाबासकी देतील. त्यांनी विदर्भ, मराठवाड्यात दौरे करण्यापेक्षा मदत करावी, तेव्हा आम्हीही त्यांचे कौतुक करू, असेही पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT